शिर्डी / नगर सह्याद्री :
शिर्डी मतदार संघात जातीपातीचे राजकारण न करता समाज जोडण्याचे काम झाले आहे. सर्वांना बरोबर घेऊन विकासाचे नवे पर्व मतदार संघामध्ये सुरू आहे. कुणी कितीही ताकत लावली तरी महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील मोठ्या मताधिक्काने निवडून येतील असा विश्वास जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष शालीनीताई विखे पाटील यांनी केला.
राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रचारार्थ पाथरे बुद्रूक येथे कार्यकर्ते आणि महिलांची संवाद साधताना विखे पाटील बोलत होत्या. विखे पाटील म्हणाल्या की, जनसेवा फौडेशनच्या माध्यमातून महिला बचत गटांचे संघटन करतांना, महिलांचा वापर केवळ राजकारणासाठी न करता महिलांना विविध योजनेच्या माध्यमातून रोजगार निर्मिती केली आहे.
चाळीस हजार महिलांचे संघटन करून महिलांना वेगवेगळ्या व्यवसायातून सक्षम करण्याचं काम करण्यात आले असून, विविध योजनेच्या माध्यमातून महिलांना आधार देण्यात आला असून चूल आणि मूल इथपर्यंत महिला सिमीत न ठेवता त्यांना आर्थिक स्वावलंबी, साक्षरतेतून सक्षम झाल्या असून शिर्डी मतदार संघातील बचत गटाचा आदर्श राज्यासाठी दिशादर्शक ठरत असल्याचे त्यांनी सांगितले.
महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी मंत्री विखे पाटील हे नेहमीच महिलांच्या पाठीशी भक्कमपणे उभे असतात. पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील, डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांच्यापासून आजपर्यंत मंत्री विखे पाटील यांनी समाज जोडण्याचं काम केले आहे. कुटुंब प्रमुख म्हणून मतदार संघातील सर्व समाजाची जबाबदारी मंत्री विखे पाटील सक्षमपणे पार पाडत पाडीत आहे.
महाविकास आघाडीने जाहीर केलेल्या महिला धोरणाचा देखील सौ. विखे पाटील यांनी चांगलाच समाचार घेतला. लाडक्या बहिणीला पंधराशे रुपये दिल्यानंतर कोर्टात जाणाऱ्या महाविकास आघाडीच्या नेत्यांनी तीन हजार रुपये देण्याबरोबरच अनेक सवलती देण्याची घोषणा केली परंतु महिला, शेतकरी, युवक, सामान्य जनतेला कोणता आधार महाविकास आघाडीच्या मागील अडीच वर्षात दिला, केवळ खोट्या घोषणा देऊन जनतेला गाजर दाखवण्याचे काम त्यांनी केले असल्याचे त्या म्हणाल्या.