Weather Update: शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. थंडीचा कडाका वाढत असतानाच राज्यात पाऊस बरसणार असल्याची शक्यता आहे. ऐन थंडीच्या दिवसात पाऊस होणार असल्याने रब्बी पिकांचं नुकसान होईल, त्यामुळे शेतकरी चिंतेत पडलेत. वर्षाच्या अखेरच्या आठवड्यात वरूण राजा बरसणार असून हवामान विभागाकडून पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आलाय. हा अलर्ट विदर्भ, मध्य महाराष्ट्रासाठी देण्यात आलाय.
राज्यातील काही जिल्ह्यात २६ डिसेंबरपासून पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय. विदर्भासह, नंदुरबार, नाशिकमध्ये जोरदार पाऊस होईल, असा इशारा देण्यात आलाय. तर मध्य महाराष्ट्रात २६ डिसेंबरपासून जोरदार पाऊस होईल, अशी शक्यता आहे. त्याचबरोबर राज्यातील इतर भागातही पाऊस होण्याची शक्यता आहे.
ईशान्यकडील राज्यांमध्ये पावसासाठी पोषक वातावरण तयार झाल्याने राज्यात पुढील काही दिवसात पाऊस होणार असल्याचा अंदाज आहे. एकीकडे थंडीचा कडाका वाढलाय, त्यात पाऊस होण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होणार आहे. पश्चिमी प्रकोपाच्या प्रेरित परिणामातून नाताळ सणात म्हणजे २५ ते २९ डिसेंबर (बुधवार ते रविवार) पाच दिवसादरम्यान संपूर्ण महाराष्ट्रात, भाग बदलत, ढगाळ वातावरण राहुन तुरळक ठिकाणीच किरकोळ पावसाची शक्यताही सध्या जाणवू लागलीय.
त्यातही विशेषतः गुरुवार २६ ते शनिवार दि.२८ डिसेंबर पर्यंतच्या तीन दिवसात पावसाची ही शक्यता अधिक जाणवत आहे.यामुळे गहू, हरभऱ्यासारख्या पिकांना ह्या पावसाने लाभ होऊ शकतो, असं वाटतं. त्यामुळे या पाच दिवसातील वातावरणातून दरवर्षी नाताळ सणाला जाणवणारी तीव्र थंडी मात्र या वर्षी ढगाळ वातावरणामुळे अनुभवता येणार नाही, असे वाटते. मात्र वर्षाअखेरीस म्हणजे सोमवार दि.३० डिसेंबर पासून हळूहळू थंडीत वाढ होऊन नववर्षाच्या उगवतीला पुन्हा थंडीचा कडाका वाढू शकतो.