Weather Update: फेब्रुवारी महिन्यापासून उष्णतेच्या लाटा जाणवू लागल्या आहेत. मार्च महिन्यात तर काही ठिकाणी पारा ४१ अंश पार गेला आहे. कुठे उन्हाच्या झळा तर, कुठे अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. हवामान खात्याने 22 आणि 23 मार्च रोजी 8 जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. कोकणातील काही भागांत उष्णतेची लाट जाणवणार असून काही भागांत हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल.
देशभरात हवामान वेगाने बदलत असून महाराष्ट्रातही त्याचा परिणाम जाणवत आहे. दक्षिणेकडून पश्चिम बंगालच्या खाडीत आणि गुजरातच्या दिशेने तीन सायक्लोनिक सर्क्युलेशन सक्रिय झाल्यामुळे हवामान अस्थिर झाले आहे. याचा प्रभाव महाराष्ट्रावरही दिसून येत असून काही भागांत पाऊस आणि गारपीट होण्याची शक्यता आहे.
हवामान विभागाच्या माहितीनुसार, राज्यातील काही भागांत 40-50 किमी प्रतितास वेगाने वारे वाहतील. सोबतच विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, काही जिल्ह्यांत उष्णतेची लाट असून पुढील काही दिवस उन्हाचा तडाखा अधिक जाणवणार आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये उन्हाची तीव्रता अधिक जाणवणार आहे. येथे पुढील काही दिवस तापमान वाढण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
दुसरीकडे, धुळे, नंदुरबार, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, परभणी, हिंगोली आणि नांदेड या जिल्ह्यांत विजांसह हलक्या पावसाची शक्यता आहे. हवामान विभागाने बुलढाणा, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ या 8 जिल्ह्यांसाठी 22-23 मार्च रोजी वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा यलो अलर्ट दिला आहे. या भागांत जोरदार पाऊस आणि वाऱ्यामुळे शेतीचे नुकसान होऊ शकते, असा इशारा देण्यात आला आहे.