मुंबई । नगर सहयाद्री
ज्या मान्सूनची सर्वजण आतुरतेने वाट पाहत होते, अखेर तो केरळमध्ये दाखल झाला आहे. विशेष बाब म्हणजे वेळेपूर्वीच मान्सून केरळात धडकला आहे. दरम्यान, मान्सून केरळमध्ये धडकताच वातावरणात मोठा बदल आहे. अनेक भागातील तापमानात काहीशी घट झाली असून ढगाळ वातावरण निर्माण झालं आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील काही जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाचा इशारा, हवामान खात्याने वर्तवला आहे.
हवामान विभागाच्या माहितीनुसार, गुरुवारी (३० मे) केरळ, नागालॅण्ड, मणिपूर, मिझोराम, अरुणाचल प्रदेश, त्रिपुरा, मेघालय आणि आसामच्या बहुतांश भागात पाऊस झाला. यासह लक्षद्वीप, दक्षिण आणि मध्य अरबी समुद्र आणि दक्षिण तमिळनाडूतही पावसाच्या सरी बरसल्या. आता येत्या २४ तासांत महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होईल, असं हवामान खात्याने सांगितलं आहे.
मान्सून केरळात दाखल झाल्यानंतर राज्यातील वातावरणात मोठा बदल झाला आहे. अनेक भागात ढगाळ वातावरण निर्माण झालं आहे. दरम्यान भारतीय हवामान खात्याने आज शुक्रवार आणि उद्या शनिवारी मुंबईसह उपनगरात हलक्या पावसाची शक्यता वर्तवली आहे कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही पावसाचा अंदाज आहे. विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रातील तुरळक ठिकाणी पाऊस होऊ शकतो, असंही हवामान खात्याने सांगितलं आहे.
महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये मान्सूनपूर्व पावसाचा अंदाज
राज्यात मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, गोंदिया, गडचिरोली, नागपूर, वर्धा, यवतमाळ, बुलडाणा, वाशिम, भंडारा, छत्रपती संभाजीनगर, परभणी, बीड, हिंगोली, धाराशिव, जालना, लातूर या जिल्ह्यांना मान्सूनपूर्व पावसाचा अंदाज आहे.
महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट
उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, धुळे, भुसावळसह मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, परभणी, बीड, जालना, लातूर या जिल्ह्यांत उष्णतासदृश्य लाट राहणार असून रात्री उकाडा वाढणार असल्याचा अंदाज पुणे हवामान विभागाने वर्तवला आहे.