मध्यमार्ग काढण्याच्या हालचाली
अहिल्यानगर | नगर सह्याद्री:-
महापालिकेने दुपटीने वाढवलेल्या पाणीपट्टीला विरोध सुरू असला, तरी पाणीपट्टी वाढवण्यावर महापालिका प्रशासन ठाम आहे. पाणीपट्टीच्या दराबाबत मध्यमार्ग काढण्यात येईल. मात्र, पाणीपट्टी वाढवावीच लागेल, असे आयुक्त यशवंत डांगे यांनी स्पष्ट केले. दरम्यान, पाणीपट्टी 3 हजार रुपयांऐवजी 2200 ते 2400 रुपये निश्चित करण्याचा विचार प्रशासकीय स्तरावर सुरू आहे.
आर्थिक अडचणीत सापडलेल्या महापालिकेने तब्बल 21 वर्षानंतर पाणीपट्टीत वाढ करण्याचा निर्णय घेतला. स्थायी समितीच्या बैठकीत 1500 रुपयांची पाणीपट्टी 3000 रुपये म्हणजे दुप्पट करण्याची शिफारस करण्यात आली. या संभाव्य कर वाढीला आता विरोध सुरू झाला आहे. प्रशासक डांगे यांनी मात्र प्रशासन पाणीपट्टी वाढवण्यावर ठाम असल्याचे स्पष्ट केले आहे. पाणी योजना व वितरण व्यवस्थेचा वर्षाचा खर्च 44 कोटी आहे. त्या तुलनेत पाणीपट्टीची मागणी केवळ 10 कोटींच्या आसपास आहे.
महापालिका ही नफा कमवणारी संस्था नक्कीच नाही. मात्र, ही तूट मोठी असल्याने काही प्रमाणात का होईना पाणीपट्टी वाढवावीच लागणार आहे. दराबाबत मध्य मार्ग काढून लवकरच निर्णय घेतला जाईल, असे आयुक्त डांगे यांनी सांगितले. दरम्यान, पाणीपट्टीबाबत प्रशासकीय स्तरावरही खल सुरू आहे. पाणीपट्टी 3 हजार ऐवजी 2200 ते 2400 रुपये निश्चित करण्याबाबत अधिकाऱ्यांमध्ये चर्चा सुरू आहे.