पारनेर । नगर सहयाद्री :-
पारनेर-नगर मतदारसंघातील सुपा पासून खडकी, खंडाळ्यासह जिल्ह्यातील विविध भागात दि २७ मे रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. नगर तालुयातील वाळुंबा नदीला आलेल्या महापुराने मोठ्या प्रमाणावर जनजीवन विस्कळीत झाले असून, यामध्ये रस्ते, शेती, पिके, जनावरे तसेच घरांचे मोठे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर आमदार काशिनाथ दाते यांनी महाराष्ट्र विधानसभेत पावसाळी अधिवेशनात नियम २९३ अंतर्गत प्रस्ताव मांडत शासनाचे लक्ष वेधले.
महापुरामुळे अनेक गावांमध्ये नागरिक अडकून पडले होते. आमदार काशिनाथ दाते यांना माहिती मिळताच घटनास्थळी जाऊन स्थानिक नागरीकांची मदत व प्रशासनाच्या मदतीने नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले. मात्र, जलसाठे, रस्ते व शेतजमीनीचे नुकसान होऊन परीसरात मोठ्या प्रमाणावर आर्थिक व सामाजिक नुकसान झाल्याचे विदारक चित्र निर्माण झालेले असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले.
जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दुसर्याच दिवशी महापूरग्रस्त भागांचा दौरा करून प्रत्यक्ष पाहणी केली. त्यांनी संबंधित विभागांना तातडीने पंचनामे करून शासनाकडे अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. त्या अनुषंगाने सर्व विभागांनी अहवाल व झालेल्या नुकसानीची आकडेवारीही सादर केली असून, परीस्थिती पुर्ववत करण्याच्या दृष्टीकोनातून अत्यावश्यक असलेल्या उपाययोजनांची माहितीही शासनाकडे पाठवण्यात आलेली असल्याचेही त्यांनी सांगितले.
पुढे बोलताना आमदार दाते म्हणाले की, शहरांमधील मेट्रो, रस्ते आदी निर्माण करण्यासाठी ज्या प्रकारे चालना दिली जाते, त्याच प्रकारे ग्रामीण विकासाला देखील चालना देणे आवश्यक आहे. वेगवेगळे महामार्ग बनवताना त्या महामार्गांना जोडल्या जाणार्या ग्रामीण भागातील रस्त्यांच्या दुरुस्ती व निर्मितीवरही भर देणे आवश्यक आहे, ज्यामुळे शहर व ग्रामीण विकासात तफावत निर्माण होणार नाही. ग्रामीण व शहरी अशा दोनही भागांचा समतोल विकास साधण आवश्यक आहे.
अतिवृष्टीमुळे मतदारसंघात मोठे नुकसान
अतिवृष्टीमुळे माझ्या मतदारसंघातील शेतीसह,रस्ते,पूल, सी.डी.वर्कचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पालकमंत्री विखे यांनी तत्परतेने नुकसानीची पाहणी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले. प्रचंड नुकसान झालेले आहे. शेतकर्यांच्या नुकसानाची शासनाने दखल घेतली पाहिजे.
– आमदार काशिनाथ दाते