अहिल्यानगर | नगर सह्याद्री
मकरसंक्रातीच्या दिवशी पतंग उडवण्याच्या व पूर्ववैमनस्यातून दोन गटांत झालेल्या हाणामारी आणि दगडफेकी प्रकरणी परस्परविरोधी फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात नऊ जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनिकेत अनिल साळवे (वय 23) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अंकुश अनिल कांबळे, आकाश अनिल कांबळे, कुणाल ऊर्फ सनी कांबळे (तिघे रा. नीलक्रांती चौक) यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मंगळवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास अनिकेत आणि त्यांचा मित्र तुषार अशोक भोसले समाज मंदिराजवळ बसलेले होते. त्यावेळी अंकुश व आकाश यांनी आरडाओरडा करत शिवीगाळ सुरू केली. हा प्रकार पाहण्यासाठी ते पुढे गेल्यावर दोघांनी अनिकेत आणि तुषार यांच्यावर कोयता, दांडके व दगडाने हल्ला केला. याच गटाने याआधी गल्लीतील तुषार दादासाहेब बोराडे यालाही मारहाण केल्याचा उल्लेख फिर्यादीत केला आहे. तिघे जखमी झाले आहेत.
दुसऱ्या गटाचे संकेत सुनील पारधे (वय 20) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून निखील अजय साळवे, रवीराज अजय साळवे, राहुल अजय साळवे, अनिकेत अनिल साळवे, तुषार भोसले व यश मकासरे (सर्व रा. निलक्रांती चौक) यांच्याविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. संकेत पारधे जखमी झाले आहेत. मंगळवारी मकरसंक्रातीच्या दिवशी संकेत आपल्या काही मित्रांसोबत पतंग उडवत होते.
यावेळी यापूव झालेल्या भांडणाच्या कारणावरून संशयित आरोपींनी दगडफेक सुरू केली. यामध्ये संकेतला पाठीत दुखापत झाली. याशिवाय, संशयित आरोपींनी रस्त्यात अडवून शिवीगाळ करत हाताने, लाथाबुक्क्यांनी व चापट्यांनी मारहाण केली. तसेच निखील साळवेने हातातील तलवारीसारख्या धारदार शस्त्राने संकेतच्या डाव्या दंडावर वार केला. पोलीस अधिक तपास करत आहेत.