अहिल्यानगर / नगर सह्याद्री –
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने लावलेल्या सापळ्यात पारनेर पंचायत समितीचे अधिकारी व कर्मचारी असे तिघे अडकले. त्यातील दोघांना अटक करण्यात आली आहे. एकजण पसार झाला आहे. या कारवाईत देयक मंजूर करण्यासाठी एका अधिकाऱ्याने दोन कर्मचाऱ्यामार्फत लाच स्वीकारताना पकडण्यात आले आहे.राज्य सरकारने गाव पातळीवरील शेतीकडे जाणारे रस्ते विकासासाठी मातोश्री ग्राम समृद्धी पानंद रस्ते योजना सुरू केली आहे. त्यासाठी मोठी तरतूद केली आहे. जिल्ह्यात हा कार्यक्रम राबवला जात आहे. या कामाच्या देयक मंजूर करण्यासाठी ६५ हजार ६०० रुपये लाच घेत असताना पारनेर पंचायत समितीच्या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उपअभियंता अजय विठ्ठल जगदाळे, रोजगार हमी विभागाकडील पॅनल तांत्रिक अधिकारी विलास नवनाथ चौधरी व तांत्रिक सहायक दिनकर दत्तात्रय मगर या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यातील विलास चौधरी व दिनकर मगर या दोघांना अटक करण्यात आल्याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक अजित त्रिपुटे यांनी दिली. नगरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने उप अभियंता अजय जगदाळे यांच्या श्रीगोंद्यातील निवासस्थानाची झडती घेतल्याचे त्यांनी सांगितले. उपअभियंता अजय जगदाळे यांची मूळ नियुक्ती श्रीगोंदा पंचायत समितीमध्ये आहे, मात्र त्यांच्याकडे पारनेर पंचायत समितीचा अतिरिक्त कार्यभाग आहे.
यातील तक्रारदाराच्या नातेवाईकाचे पारनेरमध्ये फर्म आहे. त्याचा कारभार तक्रारदार पाहतात. मातोश्री ग्राम समृद्धी पानंद रस्ते योजनेतून पारनेरमधील कारेगाव ते वाघोबा रस्ता खडीकरण व मजबुतीकरण करण्याचे काम फर्मला मिळाले आहे. या कामाचे मोजमाप करून, कामाचे देयके तयार करून ते मंजुरीसाठी पाठवण्याचे काम वरील तिघांकडे होते. तिघांसाठी मिळून ६५ हजार ६०० रुपयांच्या लाचीची मागणी तक्रारदाराकडे करण्यात आली होती. तक्रारदाराने या विरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे संपर्क साधला होता.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने या लाचेच्या मागणीची पडताळणी केली. त्यानुसार पथकाने काल, बुधवारी सायंकाळी पारनेर पंचायत समितीच्या कार्यालयात सापळा रचला. त्यावेळी पॅनल तांत्रिक अधिकारी चौधरी यांनी स्वतः करता व उपअभियंता जगदाळे याच्या करता तांत्रिक सहायक मगर यांच्यामार्फत तक्रारदाराकडून ६५ हजार ६०० रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले.पथकाचे प्रमुख उपअधीक्षक अजित त्रिपुटे यांच्या मार्गदर्शनाखाली अंमलदार संतोष शिंदे, रवींद्र निमसे, बाळासाहेब कराड, हरूण शेख यांच्या पथकाने ही कारवाई केली. अधिक तपास पोलीस निरीक्षक राजू आल्हाट करत आहेत.



