spot_img
अहमदनगरनगरात तुतारी वाजली; शिर्डीत मशाल पेटली, विखेंचा पराभव भाजपच्या जिव्हारी

नगरात तुतारी वाजली; शिर्डीत मशाल पेटली, विखेंचा पराभव भाजपच्या जिव्हारी

spot_img

डॉ. सुजय विखे यांच्या पराभवाने भाजपला मोठा धक्का | सदाशिव लोखंडेही पराभूत
सुनील चोभे / शरद झावरे | नगर सह्याद्री
अहमदनगर व शिर्डी लोकसभा मतदारसंघात झालेल्या चुरशीच्या लढतीमध्ये अखेर महाविकास आघाडीचे उमेदवार नीलेश लंके व भाऊसाहेब वाकचौरे यांनी बाजी मारली आहे. अहमदनगर दक्षिण मतदारसंघात झालेल्या लढतीत भाजपाचे विद्यमान खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांचा पराभव झाला आहे. विखे पाटील यांचा झालेला पराभव भाजपासाठी धक्कादायक मानले जात आहे.

अठराव्या लोकसभेचे धक्कादायक निकाल जाहीर झाले आहेत. महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील अहमदनगर व शिर्डी लोकसभा मतदारसंघात झालेल्या लढतीकडे राज्यासह देशाचे लक्ष लागून होते. अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा  महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव विद्यमान खासदार सुजय विखे पाटील यांच्या विरुद्ध माजी आमदार नीलेश लंके यांच्यात चुरशीची लढत झाली. गत वेळी सुजय विखे पाटील यांनी आमदार संग्राम जगताप यांना तब्बल पावणे तीन लाखांच्या फरकाने पराभूत केले होते. विखे पॅटर्नमुळे अहमदनगर लोकसभा मतदारसंघात सुजय विखे पाटील मोठ्या मताधिक्क्याने विजयी होतील असा विश्वास भाजपा समर्थकांना होता. मतमोजणीच्या सुरुवातीला सुजय विखे पाटील लीडवर राहिले. सातव्या फेरीनंतर लंके लीडवर राहिले. तोच ट्रेंड मतमोजणी अखेर कायम राहिला. विखेंना नगर व राहुरीत मताधिक्य मिळाले. तर लंके यांना पारनेरमध्ये निर्णायक लीड मिळाले. अंतिम फेरीचा निकाल हाती आला तेव्हा लंके यांनी विजयासाठी निर्णायक आघाडी घेतली होती.

शिर्डी लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे हे पहिल्यापासून आघाडीवर राहिले. तिच आघाडी कायम राहिली. वंचित बहुजन  आघाडीच्या उत्कर्षा रुपवते यांच्या उमेदवारीमुळे वाकचौरे यांना फटका बसेल असे वाटत होते. परंतु निकालून वाकचौरे मोठ्या मताधिक्क्याने विजयी झाले. विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे यांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे.

अखेर पारनेरकरांनी निकाल फिरवलाच; लंकेंच्या पदरात खासदारकी टाकली!
लोकसभेच्या नगर मतदारसंघात मतमोजणीच्या शेवटच्या क्षणापर्यंत चुरस कायम राहिली. मात्र, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार नीलेश लंके यांना त्यांच्या होमग्राऊंड समजल्या जाणार्‍या पारनेर मतदारसंघातील मतदारांनी भरभरुन साथ दिली. हीच साथ त्यांना निर्णायक ठरली. पारनेरमधून जवळपास पन्नास हजारांपेक्षा अधिकची मते लंके यांना मिळाली. नगर शहरातून जवळपास ३४ हजार मतांचे मताधिक्य सुजय विखे यांना मिळाले. मात्र, पारनेरमधून लंके यांनी मोठे मताधिक्य घेतले आणि हेच मताधिक्य तोडणे विखे यांच्यासाठी जिकीरीचे ठरले. नगर शहरातील मताधिक्यावर मात करत लंके यांनी पारनेरकरांच्या मतांच्या जोरावर विजयश्री खेचून आणली.

पारनेर तालुक्यातील सर्वच नेत्यांच्या नेतृत्वावर निर्माण झाले प्रश्नचिन्ह!
पारनेर तालुक्यातील सार्‍याच राजकीय पक्षांचे नेते नीलेश लंके यांच्या विरोधात गेले होते. माजी आमदार विजय औटी यांच्यापासून ते जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे, बांधकाम समितीचे सभापती काशिनाथ दाते, माजी नगराध्यक्ष विजय औटी, बंडू रोहोकले, विश्वनाथ कोरडे, राहुल शिंदे आदींसह अनेकजण भाजपा उमेदवार सुजय विखे यांच्यासाठी प्रचार करताना दिसले. यातील अनेकांचे एकमेकांशी विळ्याभोपळ्याचे सख्य! एकमेकांना पाण्यात पाहण्यातच यातील काहींनी प्रचार यंत्रणा राबवली. यातील काहीजण स्वत: विखे यांच्या प्रचारात असताना त्यांचे समर्थक मात्र नीलेश लंके यांच्या प्रचारात राहिले. त्याचा व्हायचा तो परिणाम झाला. निकालाच्या आकडेवारीत नीलेश लंके यांना पन्नास हजारांपेक्षा जास्तीची मते मिळाली. गत विधानसभा निवडणुकीतही हीच परिस्थिती होती. आता लोकसभा निवडणुकीत सर्व नेते एका बाजूला असताना निलेश लंके यांनी किमया साधत पारनेरचा बाजीगर आपणच असल्याचे दाखवून दिले.

थोरातांची दमदार साथ, लंके प्रतिष्ठानची यंत्रणा आली कामी
लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर आमदारकीचा राजीनामा देत नीलेश लंके यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून महाविकास आघाडीकडून लोकसभेच्या आखाड्यात उडी घेतली. स्वतः शरद पवार यांनी तालुका निहाय जाहीर सभा घेत विखे आणि भाजपाचा बुरखा फाडला. तसेच काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनीही स्वतःची यंत्रणा कामाला लावत अहमदनगर लोकसभा मतदारसंघावर बारकाईने लक्ष दिले. तसेच नीलेश लंके प्रतिष्ठानची यंत्रणा कामी आली. त्याचबरोबर नगरमध्ये माजी आमदार स्व. अनिलभैय्या राठोड समर्थकांनी केलेली मेहनत कामी आहे.

वाढलेल्या मतांचा टक्का विखे पाटलांना भोवला
अहमदनगर लोकसभा मतदारसंघासाठी यंदा ६६ टक्क्यांच्यापुढे मतदान झाले. त्यात पारनेर आणि राहुरीत ७० टक्के मतदान झाले. गतवर्षीपेक्षा यंदाच्या निवडणुकीत तब्बल सव्वा लाख वाढीव मतदान झाले. हा वाढलेला मतदानाचा टक्का कोणाला धक्का देणार हा चर्चेचा विषय ठरला होता. वाढलेले मतदान सत्ताधार्‍यांच्या विरोधात जाते असा अंदाज राजकीय जाणकारांकडून व्यक्त केला जात होता. त्याच पद्धतीने वाढलेल्या मतांचा टक्का हा विखे पाटलांना भोवला असल्याचे निकालातून दिसून येते. तसेच राहुरी आणि पारनेरमधील वाढलेला मतांचा टक्काही लंके यांच्या पारड्यात पड्याचे निकालातून दिसून येते.

राहुरी, नगरमध्ये विखेंना तर पारनेर, श्रीगोंदा,कर्जत-जामखेड, शेवगावमध्ये लंकेंना लीड
मतमोजणीच्या सुरुवातीला पोस्टल मतमोजणी झाली. पोस्टल मतमोजणीत सुजय विखे यांना लीड मिळाले. त्यानंतर साडेआठ वाजता ईव्हीएमवरील मतमोजणीला सुरुवात झाली. पहिल्या फेरीत अडीच हजारांपेक्षा अधिक लीड विखे यांना मिळाले. दुसर्‍या फेरीतही लीड कायम राहिले. सहाव्या फेरीअखेर विखे लीडवर राहिले. परंतु, सातव्या व आठव्या फेरीमध्ये लंके यांनी आघाडी घेतली. अकराव्या फेरीअखेर ११ हजारांचे लीड लंके यांना होते. तर पंधराव्या फेरीअखेर १५ हजारांचे लीड होते. फेरीनिहाय लंके यांचे लीड वाढतच राहिले. अंतिम निकाल हाती आला तेव्हा लंके यांचा मोठ्या मताधिक्क्याने विजय झाला.

मुकुंदनगर, भिंगारकरांची लंकेंना एकशिक्की साथ
अहमदनगर लोकसभा मतदारसंघाच्या निकालामध्ये सुरुवातीला सहा फेर्‍यांमध्ये विखे आघाडीवर होते. सातव्या आणि आठव्या फेरीमध्ये मुंकुंदनगर, भिंगारमधील मतपेट्या फुटल्यानंतर लंके यांनी निर्णायक आघाडीत घेतली. ती आघाडी शेवटच्या टप्प्यापर्यंत वाढत गेली. मुकुंदनगर व भिंगारमधील नागरिकांनी महायुतीचे उमेदवार नीलेश लंके यांना एकशिक्की साथ दिली असल्याचे स्पष्ट झाले. मुकुंदनगर परिसरात मतदानाच्या दिवशी स्वतः लंके यांनी बोटाला शाही लावून मुस्लिम मतदारांना घरी पाठविले जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आणला होता. त्याबाबत पत्रकार परिषदही घेतली होती. या प्रकरणावरुन संबंधितावर गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. मतदानाच्या दुपारी हा प्रकार उघडकीस आल्यानंतर स्वतः लंके दुपारनंतर मुकुंदनगर व भिंगार येथे ठाण मांडून होते.

 

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

डॉल्बी डीजे अन् लेसर लाईट्सचं काय?

पोलिसांच्या भूमिकेकडे लक्ष | जाताजाता बाप्पा म्हणाला; पुढच्या वर्षी नव्हे रे, रोजच भेटणार मी...

खा. नीलेश लंके यांना पत्र दिलेच नाही?; आ. टिळेकर यांच्याकडून ‘इन्कार’

पारनेर | नगर सह्याद्री:- मी भाजपाचा निष्ठावान कार्यकर्ता आहे. विधान परिषदेचा आमदार म्हणून मी राज्यात...

‘मुस्लीम समाजाचे नाव मतदार यादीतून कमी करण्याचे षडयंत्र’

अहमदनगर । नगर सहयाद्री:- शासनाला हाताशी धरून काही विघ्नसंतोषी लोक मुस्लीम समाजाचे नाव मतदार यादीतून...

बिबट्याच्या हल्ल्यात सात शेळ्या गेल्या; ‘या’ परिसरात ‘तीन’ बिबटे

पारनेर । नगर सहयाद्री :- तालुक्यातील पठार भागावरील गारगुंडी येथे गावाजवळील शेख वस्तीवरील आमीनभाई शेख...