अहिल्यानगर । नगर सहयाद्री:-
ऑक्टोबरपासून सुरू होणारा आठवडा हा नगरसह राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या प्रशासकीय तयारीचा आठवडा ठरणार आहे. यात नगरपंचायत, नगरपरिषद नगराध्यक्ष पदाची आरक्षण सोडत आज (दि. ६), पंचायत समिती सभापती आरक्षण सोडत उद्या (दि. ७) आणि नगरसेवक पदाचे आरक्षण सोडती बुधवार (दि. ८), तसेच जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समिती सदस्य आरक्षण सोडती पुढील आठवड्यात सोमवार (दि. १३) तारखेला होणार आहेत. निवडणुकीच्या या प्रशासकीय तयारीमुळे निवडणूक यंत्रणेसह राजकीय वातावरण तापण्यास सुरूवात झाली आहे.
जिल्ह्यातील ११ नगर पालिका आणि एका नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी आज मुंबईत आरक्षण सोडती निघणार आहेत. याबाबतचे आदेश नगर विकास विभागाच्यावतीने काढण्यात येणार आहे. नगराध्यक्षपदाच्या निवडी थेट जनतेतून होणार असल्याने निघाणाऱ्या आरक्षणाकडे त्या त्या नगर पालिका, नगरपरिषदेच्या प्रभागातील इच्छुकांच्या राहणार आहेत. त्यानंतर जिल्ह्यातील १३ पंचायत समितीच्या सभापती पदाचे (दि.७) रोजी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली नगरला काढण्यात येणार आहे. यात सहा पंचायत समिती सभापती पद हे खुल्या ल्या प्रवर्गा (३ महिला) यांच्यासाठी राहणार आहे.
या सोडतीकडे जिल्ह्याचे लक्ष राहणार आहे. त्यानंतर निवडणूक होणाऱ्या त्या त्या नगर पालिका अथवा नगर परिषद यांच्या कार्यक्षेत्रातील नगरसेवकांचे आरक्षण सोडती या बुधवार (दि.८) रोजी होणार आहेत. त्यानंतर शेवटच्या टप्प्यात ७५ जिल्हा परिषद सदस्याचे गटनिहाय आरक्षण हे सोमवार (दि. १३) तारखेला होणार आहे. या आरक्षणावर अनेक जिल्हा परिषद गटातील निवडणुकीचे चित्र अवलंबून राहणार असल्याने या आरक्षण सोडतीकडे जिल्ह्याचे लक्ष राहणार आहे. ३ नोव्हेंबर रोजी जिल्हा परिषदेचे अंतिम आरक्षण जाहीर आहे. यासह अहिल्यानगर महापालिकेची अंतिम प्रभाग रचना (दि. ९) प्रसिद्ध होणार आहे.
इच्छुक उमेदवारांच्या हालचालींना गती
राज्यातील अनेक नगरपरिषद, नगरपंचायती, पंचायत समित्या व जिल्हा परिषदांच्या निवडणुका रखडल्या होत्या. मात्र आता दिवाळीनंतर निवडणुका होण्याची शक्यता बलवत्तर झाली आहे. परिणामी, इच्छुक उमेदवारांनी गट, गण, प्रभाग पातळीवर भेटीगाठी वाढवून आरक्षणाचा अंदाज घेत निवडणूक रणनिती आखण्यास सुरूवात केली आहे.
जिल्ह्यात ३८ लाखांहून अधिक मतदार
जिल्हा परिषद व १४ पंचायत समितींसाठी – ३०,०७,४०४ मतदार
महानगरपालिका, ११ नगरपरिषद व १ नगरपंचायतीसाठी – ८,२४,५३६ मतदार
एकूण मतदार – ३८,३१,९४०
नवीन मतदारांची नोंदणी अजून सुरू असली तरी, निवडणूक आयोग १ जुलै २०२५ रोजीच्या यादीस अंतिम मान्यता देणार आहे. त्यामुळे त्यानंतर नोंदणीकृत झालेल्या सुमारे १३,१२० नवमतदारांना यंदा मतदानाचा अधिकार मिळणार नाही.
वर्षभरात ८४ हजार मतदारांची भर
नोव्हेंबर २०२४ विधानसभा निवडणुकीत: ३७,६०,५१२ मतदार
सप्टेंबर २०२५ अखेर: ३८,४५,०६० मतदार
वाढ: ८४,५४८ मतदार यामध्ये मोठ्या प्रमाणात तरुण व नवमतदारांची भर असल्याचे निवडणूक विभागाने स्पष्ट केले आहे.
राज्यभरात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी वातावरण पुन्हा तापू लागले आहे. आरक्षण सोडतीच्या प्रक्रियेनंतर इच्छुक उमेदवारांची चाचपणी व हालचाल आणखी तीव्र होणार असून, लवकरच प्रचाराची रणधुमाळी सुरू होण्याची शक्यता आहे. आगामी आठवड्यात संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष या सोडतीवर केंद्रित असणार आहे.