अहिल्यानगर । नगर सहयाद्री
पंपिंग स्टेशन रस्त्यावरील कराळे क्लब हाऊसजवळ शुक्रवारी दुपारी एक धक्कादायक घटना घडली. रस्त्याच्या कडेला थांबवलेल्या इर्टिगा कारमध्ये ड्रायव्हिंग सीटवर बसलेल्या एका युवकाने चुकून ब्रेकऐवजी एक्सेलेटर दाबल्याने कार दोन फुटांचा कठडा ओलांडून ओढ्यात पलटी झाली. कार चालू असल्याने आणि ती चालवण्याचा अनुभव नसल्याने हा अपघात घडल्याचे सांगण्यात आले.
या घटनेत नालेगाव येथील दोन युवक कारमध्ये होते. अपघाताचा आवाज ऐकून करण कराळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी कारच्या काचा फोडून दोन्ही युवकांना सुखरूप बाहेर काढले. दोघांना किरकोळ जखमा झाल्या असून, गंभीर दुखापत टळली. काही वेळाने क्रेनच्या साहाय्याने कार ओढ्यातून बाहेर काढण्यात आली.
ही कार दीड महिन्यांपूव खरेदी करण्यात आली होती. घटनेची माहिती मिळाल्यावरही रात्री उशिरापर्यंत याप्रकरणी पोलिसात कोणतीही तक्रार नोंदवण्यात आली नव्हती. या अपघातामुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, वाहन चालवताना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन नागरिकांनी केले आहे.