मुंबई / नगर सह्याद्री –
राजधानी मुंबईत दहीहंडी उत्सवाचा मोठा जल्लोष पाहायला मिळत असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह अनेक राजकीय नेते दहीहंडी उत्सवात सहभागी होत गोविंदाचा उत्साह वाढवत आहेत. दुसरीकडे अभिनेते, सेलिब्रिटीही आणि नृत्यांगणा गौतमी पाटीलचाही जलवा पाहायला मिळत आहे. उंचच उंच मनोरे रचत गोविंदा पथके नव्याने विक्रमही रचत आहेत. एकीकडे गोविंदा पथकांनी विक्रमांचे मनोरे रचले असताना दुसरीकडे मुंबईतील मानखुर्द एका गोविंदाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. त्यामुळे, दहीहंडी उत्सवाला गालबोट लागले असून दहीहंडीचा रोप बांधताना हा अपघात झाल्याची माहिती आहे.
मानखुर्दमध्ये एका गोविंदाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली असून बाल गोविंदा पथकातील लहानग्या गोविंदाला जीव गमवावा लागल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. मानखुर्दच्या महाराष्ट्र नगर येथील ही दुर्घटना असून दहिहंडी रोप बांधताना तोल गेल्याने गोविंदाचा खाली पडून अपघात झाला. या दुर्घटनेनंतर जखमी अवस्थेतील गोविंदाला गोवंडीतील शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी गोविंदाला मृत घोषित केले. या अपघाताच्या घटनेनं दहीहंडी उत्सवाला गालबोट लागले असून बाल गोविंदा पथकावर शोककळा पसरली आहे.
मुंबईतील दहीहंडी उत्सावात सकाळपासून 30 गोविंदा जखमी झाले असून एका गोविंदाचा मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. मानखुर्द येथे दुपारी 3 वाजता गोविंदाच्या अपघाताची घटना घडली. जगमोहन शिवकुमार चौधरी असं मृत्यूमुखी पडलेल्या गोविंदाचे नाव आहे. जखमी झालेल्या 30 गोविंदांपैकी प्राथमिक उपचारानंतर 15 गोविंदाना आलं घरी सोडण्यात आलं आहे. तर, अद्यापही 15 गोविंदा उपचारासाठी रुग्णालयात भरती करण्यात आलेले आहेत.
राज्यात दहीहंडीनिमित्त उत्सवाचे वातावरण पाहायला मिळत आहे. मुंबई, ठाण्यातील दहीहंडी विशेष चर्चेचा विषय ठरते. मुंबई सुरु असलेल्या पावसामुळे गोविंदा पथकांच्या आनंदात आणखी वाढ झाली आहे. याचदरम्यान आता यंदाच्या वर्षी ठाण्यात जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाने तब्बल १० थर रचून विश्वविक्रम केला.
जोगेश्वरी येथील कोकण नगर गोविंदा पथकाने ही विश्वविक्रमी कामगिरी करून दाखवली. यानंतर सर्वांनी एकच जल्लोष केला. शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या संस्कृती दहीहंडी कार्यक्रमात १० थर रचण्याचा हा विश्वविक्रम करण्यात आला. यावेळी प्रताप सरनाईक यांनी आनंद व्यक्त करत या पथकाला २५ लाखांचे बक्षीस जाहीर केले आहे.
प्रताप सरनाईक म्हणाले, “कोकण नगर मनापासून अभिनंदन करतो. खऱ्या अर्थाने राष्ट्रभक्ती दाखवली. कोणी कितीही काही म्हणू द्या, तुम्ही मराठी एकी दाखवली. मी या पथकाला २५ लाखांचे बक्षीस जाहीर करतो. काही गोविंदा पथकानं वाटते आमचा विश्वविक्रम मोडणार नाही पण दुसरे पथक देखील विश्वविक्रम मोडत असतो. विश्व विक्रम मोडण्यासाठी असतो. याच मैदानावर आधी पण विश्व विक्रम झाला आहे आणि आताही झाले.”
‘जय जवान’ गोविंदा पथकाने रचले होते 9 थर
मागील काही वर्षात ‘जय जवान’ गोविंदा पथक हे सातत्याने 9 थर रचत आलं आहे. यंदा मात्र, अत्यंत आश्चर्यरित्या जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा मंडळाने कडक 10 थर रचून विश्वविक्रमाला गवसणी घातली. गोविंदांनी दाखवलेल्या शिस्त, समन्वय आणि धाडसाचे उपस्थित प्रेक्षकांनी टाळ्यांचा कडकडाटसह आनंद व्यक्त केला.
यापूर्वी जय जवान गोविंदा पथकाने 2012 मध्ये 9 थर रचून विश्वविक्रम नोंदवला होता, परंतु कोकण नगर पथकाने यंदा हा विक्रम मोडला. या थरारक कामगिरीसाठी पथकाने अनेक महिने कठोर सराव केला होता.