अहमदनगर | नगर सह्याद्री
बंदी असतानाही संगमनेर शहरात गोवंशीय जनावरांची कत्तल करून त्यांचे मांस विक्री केली जात असल्याची माहिती मिळाल्यावरून जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या आदेशावरून अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने संगमनेर येथे कारवाई करून संबंधित तीन आरोपींना जेरबंद केले व त्यांच्या ताब्यातून २० लाख ७२ रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला. ही कारवाई शुक्रवार १९ एप्रिल २०२४ रोजी करण्यात आली.
अहमदनगर जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर, यांना जिल्ह्यातील अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्याच्या दृष्टीने माहिती घेऊन कायदेशीर कारवाई करण्याबाबत आदेश दिले होते. त्या आदेशान्वये पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस उपनिरीक्षक तुषार धाकराव, पोलीस अंमलदार सचिन अडबल, बापूसाहेब फोलाणे, गणेश भिंगारदे, संतोष लोढे, अतुल लोटके, संतोष खैरे, रणजीत जाधव, रवींद्र घुंगासे, सागर ससाणे, बाळासाहेब गुंजाळ, आकाश काळे, विशाल तनपुरे, उमाकांत गावडे यांचे पथक तयार केले. त्या पथकास अवैध धंद्याची माहिती काढून कारवाई करण्याकामी सूचना देऊन पथकास गेल्या १९ एप्रिल रोजी संगमनेर शहरात रवाना केले.
तेथे संगमनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये अवैध धंद्यांची माहिती काढत असताना पोलीस पथकास शहरातील जमजम कॉलनी या ठिकाणी गोवंश जातीची जिवंत जनावरे कत्तल करण्याच्या उद्देशाने आणल्याचे समजले. राज्यात गोवंशांची कत्तल करण्यास बंदी असतानाही त्यांची कत्तलही चालू असल्याची माहिती मिळाली. तेव्हा रात्री ०२.१५ वाजण्याच्या सुमारास पोलीस पथक तेथे गेले. तेव्हा ०३ इसम दोन पिकअपमध्ये कत्तल केलेले जनावरांचे मांस भरताना दिसले. तेव्हा पथकाने तिथे छापा टाकून संबंधित तीन इसमांना ताब्यात घेतले. रैय्यान शेरखान पठाण (वय २१ वर्षे, रा. रहेमतनगर, जोर्वे रोड, संगमनेर), सलमान हारुन मणियार (वय ३४ वर्षे, रा. मोमीनपुरा, छोटी मस्जिदजवळ, संगमनेर), राझिक अब्दुल रज्जाक शेख (वय ३८ वर्षे, रा. अलकानगर, दिल्ली नाका, संगमनेर) अशी त्यांची नावे असल्याचे आढून आले.
ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींकडून सहा लाख रुपये किमतीचे पिकअप वाहन (क्रमांक एमएच-१७-बीडी-४१८२) व त्यामधील चार लाख ५० हजार रुपये किमतीचे दीड हजार किलो गोमांस, सहा लाख रुपये किमतीचे पिकअप वाहन (क्रमांक-एमएच-११-एजी-३२४) व त्यामधील एक हजार ४०० किलो गोमांस, दोन हजार रुपये किमतीचा एक सत्तूर, दोन सुरे व एक कुर्हाड असा एकूण २० लाख ७२ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केेला.
आरोपींविरोधात पोलीस हेड कॉन्स्टेबल सचिन दत्तात्रय अडबल यांच्या फिर्यादीवरून संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास संगमनेर शहर पोलीस ठाणे करीत आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला, श्रीरामपूरचे अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, संगमनेर उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाकचौरे यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केली.