Maharashtra Crime : कौटुंबिक वादाचे रूपांतर हत्येत झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. नातेसंबंधातील वाद मिटवण्यासाठी सासुरवाडीत गेलेल्या एका तरुणाची सासरच्या नातेवाइकांनी निर्घृण हत्या केल्याची घटना समोर आली असून, या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे. सदरचा प्रकार अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यातील अंबाशी गावात घडला.
हत्येची शिकार झालेल्या तरुणाचे नाव नागेश गोपनारायण असे आहे. तो आपल्या पत्नीच्या माहेरी, अंबाशी गावात वाद मिटवण्यासाठी गेला होता. मात्र वाद मिटवण्याच्या प्रयत्नातच शाब्दिक चकमक होऊन त्याचे रुपांतर हाणामारीत झाले. यावेळी काही नातेवाइकांनी नागेशवर काठ्या, चाकू आणि कुऱ्हाडीने सपासप वार केले.
या हल्ल्यात नागेश गंभीर जखमी झाला. अतिरक्तस्रावामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला, अशी प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे. घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली असून, चान्नी पोलिसांनी तात्काळ कारवाई करत सिद्धार्थ शांताराम चोटमल, रेखा शांताराम चोटमल, नंदा दिलीप डोंगरे यांना अटक केली आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून, हत्येमागील नेमके कारण शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत.