अहिल्यानगर । नगर सहयाद्री:-
शेवगाव तालुक्यातील मुंगी शिवारात गोदावरी नदीपात्रालगत मिळालेल्या अज्ञात प्रेताचा तपास अखेर स्थानिक गुन्हे शाखेच्या दक्ष तपासामुळे उकलला आहे. प्रेमसंबंधातील वादातून एका तरूणाचा खुन करून प्रेताची विल्हेवाट लावणारे प्रेमीयुगुल जेरबंद करण्यात आले असून त्यांना मदत करणारा साथीदार पसार आहे. 12 ऑगस्ट 2025 रोजी मुंगी शिवारात शेताच्या कडेला एका अज्ञात पुरूषाचा मृतदेह आढळून आला.
सुरूवातीला शेवगाव पोलिसांनी हा प्रकार अकस्मात मृत्यू म्हणून नोंदवला. परंतु मृतदेहाच्या गळ्यावर धारदार शस्त्राचे घाव आढळल्याने संशय अधिक बळावला. या गुन्ह्याच्या तपासासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कबाडी यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक स्थापन करण्यात आले.
या पथकाने सलग चार दिवस तपास करून मृतदेहाची ओळख पटवली. मृतकाचे नाव सचिन पुंडलिक औताडे (वय 32, रा. शिवनेरी कॉलनी, हार्सुल, छत्रपती संभाजीनगर) असे समोर आले. तपासादरम्यान संशयितांची माहिती मिळताच पोलिसांनी बुलढाणा जिल्ह्यात शोधमोहीम राबवली.
त्यात दुर्गेश मदन तिवारी (रा. वडोद, ता. खुलताबाद, छत्रपती संभाजीनगर) व भारती रवींद्र दुबे (रा. सिडको, छत्रपती संभाजीनगर) या दोघांना चौकशीसाठी आणले असता त्यांनी कबुली दिली की, मृतक सचिन औताडे याचा त्यांच्या वैयक्तिक प्रेमसंबंधातील वादाशी संबंध होता. अफरोज खान (पूर्ण नाव माहिती नाही, रा. खटखट गेट, छत्रपती संभाजीनगर) याच्या मदतीने 31 जुलैच्या रात्री सचिनचा गळा चाकूने कापून खुन केला. त्यानंतर प्रेत व वापरलेला चाकू, कपडे इत्यादी वस्तू गाडीतून गोदावरी नदीकाठी फेकून दिले, अशी कबूली दिली.
मृतकाचा भाऊ राहुल औताडे यांच्या फिर्यादीवरून शेवगाव पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. सदर संशयित आरोपींना पुढील तपासकामी शेवगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. या गुन्ह्याचा पर्दाफाश करण्यामध्ये स्थानिक गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक राजेंद्र वाघ यांच्यासह अंमलदार फुरकान शेख, बाळासाहेब गुंजाळ, बाळासाहेब खेडकर, रमिझराजा आतार, प्रशांत राठोड, भगवान धुळे व सारिका दरेकर यांनी विशेष मेहनत घेतली.