अहिल्यानगर । नगर सहयाद्री:-
शनेश्वर प्रतिष्ठान संचलित लोकमान्य टिळक मित्र मंडळाच्या वतीने गणेश उत्सवानिमित्त शिव पार्वती विवाह सोहळा या लाईव्ह देखाव्याचे उद्घाटन आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते संपन्न झाले. शिवपार्वती विवाह सोहळ्याचा लाईव्ह देखावा नगरकरांचे मोठे आकर्षण ठरेल असे मत आ. जगताप यांनी व्यक्त केले.
यावेळी आमदार संग्राम जगताप यांनी देखाव्याचा पाहण्याचा आनंद घेतला.
याप्रसंगी बोलताना आमदार संग्राम जगताप म्हणाले की, महाराष्ट्राची संस्कृती परंपरा महान असून अध्यात्मिकतेला मोठे महत्त्व आहे. श्री महादेवाच्या भक्तीतून ऊर्जा निर्माण होत असते. हिंदू धर्मामध्ये 16 सोमवारच्या व्रताला मोठे महत्त्व असून महिला मनोभावे शिवभक्ती करतात. शिवपार्वती विवाह सोहळ्याचा हा लाईव्ह देखावा नगरकरांचे मोठे आकर्षण ठरेल. लोकमान्य टिळक मित्र मंडळ वर्षभर विविध सामाजिक, धार्मिक व अध्यात्मिक उपक्रम राबवते. त्याचबरोबर रक्तदान शिबिर, वृक्षारोपण व संवर्धन यासारखी कार्येही मंडळ करते. गरजूंना मदतीसाठी धावून जाण्याची परंपरा लोकमान्य टिळक मित्र मंडळाने जपली आहे.
देखाव्याच्या उद्घाटनावेळी माजी उपमहापौर अनिल बोरुडे, माजी सभापती अविनाश घुले, मार्गदर्शक गोरख पडोळे, निलेश गाडळकर, अध्यक्ष अक्षय गाडळकर, उपाध्यक्ष विकी कानडे, श्रेयस धाडगे, नंदू जाधव, अमित कानडे, प्रशांत दळवी, शुभम चिंतामणी, सोनू निमसे, युवराज पडोळे, सौरभ कानडे, कुमार गाडळकर, श्रेयस पडोळे, तुषार कोरडे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी गोरख पडोळे म्हणाले की, लोकमान्य टिळक मित्र मंडळाच्या वतीने गणेश उत्सवानिमित्त साकारण्यात आलेला शिवपार्वती विवाह हा लाईव्ह देखावा नगरकरांचे प्रमुख आकर्षण ठरत आहे. पुणे येथील कलाकारांनी शिवपार्वती भक्तीचे दर्शन या देखाव्याच्या माध्यमातून घडवले असून धार्मिकतेचे पवित्र वातावरण परिसरात निर्माण झाले आहे. याचा आनंद आमदार संग्राम जगताप यांनी देखील घेतला. दरम्यान, टिळक रोड परिसर हर हर महादेवच्या जयघोषाने दुमदुमून गेला होता. या सोहळ्यामुळे गणेशोत्सवाला धार्मिक अध्यात्मिकतेची विशेष जोड मिळाल्याचे नागरिकांनी व्यक्त केले.