अहिल्यानगर | नगर सह्याद्री
राहुरी तालुयात सामान्य नागरिकांमध्ये दहशत पसरवून बेकायदेशीर वाळू तस्करी करणारे तसेच महिला अत्याचारासारखे गंभीर गुन्हे दाखल असलेली टोळी अखेर हद्दपार करण्यात आली आहे. टोळीप्रमुख दीपक बबन लाटे याच्यासह ५ जणांच्या टोळीला अहिल्यानगर जिल्ह्याच्या हद्दीतून १ वर्षाकरिता हद्दपार करण्याचे आदेश जिल्हा हद्दपार प्राधिकरणाने दिले आहेत. या कारवाईमुळे परिसरातील गुन्हेगारी वृत्तीवर व दहशतीवर नियंत्रण मिळण्यास मदत होणार आहे.
राहुरी तालुयातील चिंचोली येथील दीपक बबन लाटे (वय ३६) याने त्याचे सदस्य निखील बबन लाटे (वय ३४, रा. चिंचोली), शहादेव विठ्ठल माने (वय ३४, रा. लेंडी तलाव, बुलढाणा), अभिषेक राजेंद्र नाचणे (वय ३२, रा. बेलापूर, ता. राहुरी), शंकर राजेंद्र भोसले (वय २८, रा. पिंपळगाव फुणगी) व इतरांसह एक गुन्हेगारी टोळी तयार केली होती. या टोळीने आपले गुन्हेगारी अस्तित्व टिकवण्यासाठी सातत्याने गुंडगिरी केली.
महिला अत्याचाराचे गुन्हे, मारहाण व दहशत, बेकायदा कृत्य व इतर गुन्हे टोळीवर दाखल आहेत. टोळीप्रमुख आणि सदस्यांविरुद्ध सन २०१७ पासून गुन्हे दाखल आहेत, तसेच राहुरी पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्यावर टोळीच्या सततच्या गुंडगिरीमुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते आणि नागरिक उघडपणे तक्रार करण्यास किंवा साक्ष देण्यासाठी पुढे येत नव्हते. भविष्यात गंभीर स्वरूपाचे गुन्हे होण्याची शयता असल्याने, राहुरी पोलीस स्टेशनचे निरीक्षक संजय ठेंगे यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९७१ चे कलम ५५ नुसार टोळीला हद्दपार करण्याचा प्रस्ताव पोलीस अधीक्षक तथा हद्दपार प्राधिकरणाकडे सादर केला होता. उप विभागीय पोलीस अधिकारी, श्रीरामपूर विभाग, जयदत्त भवर यांनी या प्रस्तावाची चौकशी करून शिफारस केली.
सखोल चौकशीअंती टोळीप्रमुख दीपक बबन लाटे आणि सदस्य निखील बबन लाटे, शहादेव विठ्ठल माने, अभिषेक राजेंद्र नाचणे यांना अहिल्यानगर जिल्ह्यातुन १ वर्षाकरिता हद्दपार करण्याचे आदेश पारित करण्यात आले आहेत.



