मुंबई ।नगर सहयाद्री:-
बंगालच्या उपसागरात फेंगल चक्रीवादळानं दक्षिणेकडील राज्यांना पावसाचा तडाखा बसला. चक्राकार वारे आणि कमी दाबाचा पट्टा वायव्येकडे सरकत अरबी समुद्राकडे आल्याने महाराष्ट्रातही गेल्या चार दिवसांपासून पावसाला पोषक वातावरण तयार झाले होते. हिवाळ्याची चाहूल लागताच आलेल्या अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. राज्यात ढगाळ वातावरणासह तापमानही वाढले होते.
पण आता कमी दाबाचा पट्टा सैल झाला असून राज्यात पुन्हा गुलाबी थंडीला सुरुवात होणार आहे. येत्या दोन दिवसात काही भागात हलक्या सरींची शक्यता असली तरी उर्वरित भागात हवामान कोरडे होण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे आता राज्यात गारठा वाढणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. तब्बल आठ दिवसांनी पुन्हा वातावरणात बदल होऊन थंडीची चाहूल लागली आहे.
थंडीच्या पुनरागमन झाल्यामुळे बागायतदार सुखावले आहेत. फेंगल चक्रीवादळाच्या इफेक्टनंतर आज 7 डिसेंबर रोजी किमान तापमानात गेल्या दोन दिवसांच्या तुलनेत घट झाल्याचे पहायला मिळाले. राज्यात शनिवारी निचांकी तापमानाची नोंद झाली असून 15.7 अंश सेल्सियस तापमान नोंदवले गेले. तर काही भागात 17 ते 23 अंशांपर्यंत तापमानाची नोंद झाली. दरम्यान, काही भागात ढगाळ वातावरण आणि हलक्या पावसाची शक्यता आहे.
7 डिसेंबरपासून तापमानात होणार घट
राज्यात गेल्या 3 ते 4 दिवसांपासून ढगाळ वातावरण निर्माण झालं होते. काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाने हजेरी लावली. थंडीचा जोर पूर्णपणे कमी झाला, तर काही भागात उकाडा जाणवू लागला आहे. 9 डिसेंबरपर्यंत राज्यातील बहुतांश भागांत शुष्क अन् कोरडे वातावरण राहणार असल्याची शक्यता आहे, तर 7 डिसेंबरपासून पुन्हा तापमानात घट होऊन थंडी वाढणार आहे.