अहिल्यानगर । नगर सहयाद्री:–
देशभरात साखर उत्पादनात घट होण्याची शक्यता आणि साखरेच्या निर्यातीस देण्यात आलेली परवानगी यामुळे गत महिनाभरात क्विंटलमागे 300 रूपयांची दरवाढ झाली आहे. 10 लाख टन निर्यातीला अलिकडेच मिळालेल्या परवानगीमुळे कारखान्यांना दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.
या निर्णयामुळे देशांतर्गत बाजारपेठेत साखरेच्या किमती वाढल्या आहेत. सरकारने निर्यातीचा निर्णय जाहीर केल्यानंतर, देशांतर्गत बाजारभावात लगेच सकारात्मक बदल दिसला.
या घोषणेनंतर, महाराष्ट्रात 3350 रुपये आणि उत्तर प्रदेशात 3650 रुपये या दोन-तीन महिन्यांच्या नीचांकी पातळीवरून देशांतर्गत किमती महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशात अनुक्रमे 3800 रुपये आणि 4100 रुपये प्रती क्विंटलपर्यंत वाढल्या आहे.
केंद्रीय अन्न मंत्रालयाने फेब्रुवारी 2025 साठी 22.5 लाख मेट्रिक टन देशांतर्गत साखरेचा कोटा जाहीर केल्यानंतर बाजारातील ट्रेंड अधिक सकारात्मक झाला आहेत. महाराष्ट्रातील ड/30 साखरेचा दर प्रती क्विंटल 3800 ते 3825 रुपये आहे.