मुंबई | नगर सह्याद्री
अवकाळी पावसानंतर पुन्हा एकदा कडाक्याचं ऊन पडायला सुरूवात झाली आहे. महाराष्ट्रात तीव्र उष्णतेची लाट येणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. विदर्भ आणि मराठवाड्यात सूर्य आग ओकतोय. त्यामुळे गरज नसेल तर घराबाहेर पडू नका, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. विदर्भातील अनेक जिल्ह्याचा पारा 44 अंशावर पोहचला आहे. पुढील दोन दिवस आणखी तापमान वाढण्याची शक्यता आहे. हवमान विभागाने विदर्भात उष्णतेचा यलो अलर्ट दिला आहे.
राज्यात एकीकडे उष्णतेचा इशारा दिला असतानाच काही ठिकाणी अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कोल्हापूर, सांगली, सातारा अन् लातूरमध्ये अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विदर्भात उष्णतेचा पारा दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. अवकाळी पावसानंतर सूर्य आग ओकत असल्याची स्थिती निर्माण झाली आहे. अकोल्याचे कमाल तापमान 44 अंशावर पोहोचले आहे. पुढील दोन दिवस तापमानाचा पारा आणखी वाढण्याचीच शक्यता आहे. गेल्या काही दिवसात विदर्भातील पारा सरासरीपेक्षा चार अंशांनी वाढला आहे. अकोल्याचे तापमान राज्यातील सर्वाधिक 44.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.
उष्णता आणखी वाढणार
पुढील दोन दिवस विदर्भात उष्ण लाटांचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. हवामान विभागाकडून उष्णतेचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. बदलत्या वातावरणीय स्थितीमुळे मध्य भारत, उत्तर-पश्चिम राज्यासह संपूर्ण महाराष्ट्रात पुढील तीन दिवसात कमाल तापमानात 2 ते 4 अंशाची वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यंदाच्या उन्हाळ्यातील चालू आठवडा हा मराठवाड्यासाठी अति हॉट ठरतोय. आता मराठवाड्यात आगामी 3 दिवस उष्णतेची लाट असेल असा हवामान विभागाने अंदाज वर्तविला आहे.
अवकाळी पावसाचा इशारा
हवामान विभागाने कोल्हापूर, सातारा, सांगली, छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीड जिल्ह्यात काही ठिकाणी ढगांच्या गडगडाटासह हलक्या पावसाचा अंदाज दिला. तर सोलापूर आणि परभणी जिल्ह्यात बुधवारी तर लातूर आणि धाराशिव जिल्ह्यात बुधवार आणि गुरुवारी, नांदेड जिल्ह्यात गुरुवारी पावसाचा अंदाज असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. तर चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात शुक्रवारी काही ठिकाणी विजा आणि ढगांच्या गडगाटासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला.