नवी दिल्ली / वृत्तसंस्था –
स्पेनचा दिग्गज टेनिसपटू राफेल नदालने आज मोठी घोषणा केली आहे. नदालने त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का देत निवृत्ती जाहीर केली आहे. पुढील महिन्यात होणाऱ्या डेव्हिस कप फायनलनंतर तो टेनिसच्या कोर्टवरून निवृत्ती घेणार असल्याचं नदालने सांगितलं आहे. अशा पद्धतीने टेनिसपटू राफेल नदालने त्याचा करिअरला अखेरचा निरोप दिलाय.
इन्स्टाग्रामवरून दिली निवृत्तीची माहिती
टेनिसपटू राफेल नदालने गुरुवारी इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर करून चाहत्यांना ही माहिती दिली. राफेल नदालने या व्हिडिओमध्ये सांगितलंय की, त्याने खूप विचार करून हा निर्णय घेतला आहे. यावेळी त्याच्या कारकिर्दीतील शेवटचा सामना डेव्हिस कप फायनल असणार आहे. मुख्य म्हणजे ही तीच स्पर्धा आहे ज्या ठिकाणहून नदालने 2004 मध्ये त्याच्या कारकिर्दीला सुरुवात केली होती.
१२ भाषांमध्ये मानले आभार
स्पॅनियार्ड गेल्या काही वर्षांत दुखापतींशी झुंजत आहे आणि २०२३ मध्ये त्याने निवृत्तीचे संकेत दिले होते. मात्र आज नदालने त्याच्या या विचारावर शिक्कामोर्तब केलं आहे. या व्हिडीओमध्ये नदालने सांगितलं आहे की, गेली दोन वर्षे त्याच्यासाठी खूप कठीण गेली आहेत. तो आपले 100 टक्के देऊ शकला नाही आणि म्हणूनच तो हा कठीण निर्णय घेतोय.. पोस्टच्या कॅप्शनमध्ये नदालने १२ भाषांमध्ये सर्वांचे आभार मानले आहेत.
३८ वर्षीय राफेलने कारकीर्दित २२ ग्रँडस्लॅम जेतेपदं नावावर केलंय. याशिवाय त्याने २००९ आणि २०२२ मध्ये ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धा जिंकली होती. इतकंच नाही तर नदालने फ्रेंच ओपन स्पर्धेची सर्वोत्तम १४ जेतेपदं नावावर केलीयेत. विम्बल्डनची चार विजेतेपद नदालच्या नावे आहेत. २००८ मध्ये बीजिंग ऑलिम्पिकमध्ये एकेरी प्रकारात सुवर्णपदक आणि 2016 मध्ये रिओ ऑलिम्पिकमध्ये दुहेरीत सुवर्णपदकावर आपलं नाव कोरलं होतं.



