पुणे। नगर सह्याद्री
पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात तरुणीवर झालेल्या आत्याचाराची घटना ताजी असतानाच महाराष्ट्रात आणखी एका घटनेने खळबळ उडाली आहे. नागपुरात एका अल्पवयीन मुलीवर बस चालकाने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नराधम आरोपीने एका रात्रीत तीन शहरं फिरवत तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. संदीप कदम असं अटक केलेल्या आरोपीचं नाव असून तो नागपूर बसडेपोत चालक म्हणून काम करतो.
याबाबत अधिक माहिती अशी; शनिवार दि. 22 मार्च रोजी पीडित मुलगी उमरखेड बस स्थानक परिसरात बसची वाट पाहत होती. त्याचवेळी आरोपीने तिला ‘कुठं जायचं’ असं विचारलं. यावर तिने नांदेडला जायचं असल्याचं सांगितलं. यानंतर आरोपी संदीपने मी तुला नांदेडला सोडतो, असं सांगितलं आणि तो तिला उमरखेडहून नांदेडला घेऊन गेला.
पुढे नांदेडमधील काम उरकल्यानंतर आरोपी तिला नागपुरला घेऊन आला. नागपूरला बस पोहोचल्यानंतर आरोपी तिला आपल्या खोलीवर घेऊन गेला आणि याचठिकाणी त्याने तरुण मुलीवर अत्याचार केले. यानंतर पीडित तरुणीला नराधम आरोपीने नागपूर-सोलापूर या बसने उमरखेडला सोडून दिले. मुलगी शनिवार आणि रविवार दोन दिवस घरी परत न आल्याने तिचे कुटुंबीय चिंताग्रस्त झाले.
त्यांनी तातडीने पोलीस ठाण्यात मुलगी बेपत्ता असल्याचं सांगितलं. यानंतर पोलिसांनी देखील वेगाने तपास केला असता मुलगी ही आरोपी संदीप कदम याच्यासोबत दिसल्याची माहिती मिळाली. दरम्यान, पोलिसांनी आरोपीला उमरखेड बस स्थानकावरून अटक केली असून त्याच्यावर गुन्हा दाखल केला गेला आहे.