Accident News: सात वर्षाच्या मुलासमोर आपल्या वडिलांचा अपघाती मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. पाथर्डी तालुक्यातील चितळवाडी येथे सोमवारी(23 डिसेंबर) दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास कार व दुचाकीची धडक होऊन हा अपघात झाला.
दुचाकीवरील भाऊराव केशव चितळे (वय 35 रा. धनगरवाडी ता.पाथर्डी) हे अपघातामध्ये ठार झाले. दुचाकीवर चितळे यांच्यासोबत सात वर्षाचा मुलगा कृष्णा होता. अपघातात चितळे हे रस्त्यावर पडले तर त्यांचा मुलगा कृष्णा हा रस्त्याच्या बाजूला पडला.
चितळे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला तर मुलगा कृष्णा चितळे याला किरकोळ दुखापत झाली. नियतीचा अनोखा खेळ या अपघातामध्ये पहायला मिळाला असून वडिलांचा मुलाच्या डोळ्यासमोर दुर्दैवी अंत झाल्याने अपघातस्थळी अनेकांना अश्रू अनावर झाले.
बापलेक धामणगाव येथून धनगरवाडी याठिकाणी जात होते. त्यावेळी बारामती -पैठण राज्य महामार्गावर चितळवाडी फाटा नजीक धोकादायक वळणावर हा अपघात झाला. भाऊराव चितळे हे शेती करून आपला उदरनिर्वाह करत होते. त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.