संगमनेर / नगर सह्याद्री –
निवडणुका जाहीर झाल्यापासून संगमनेरचे राजकारण राज्याच्या केंद्रस्थानी आले. विखे आणि थोरात यांच्यातील संघर्ष जगजाहीर आहे. यात सुजय विखे हे संगमनेर विधानसभेला उभे राहणार अशा चर्चा रंगू लागल्या होत्या परंतु आज या सर्व चर्चा फोल ठरवत भारतीय जनता पार्टी आणि विखे गटाचे निष्ठावान कार्यकर्ते अमोल खताळ यांना शिवसेने कडून उमेदवारी जाहीर झाली आहे.
गेल्या कित्येक वर्षापासून संगमनेर विधान सभेचे जागा ही शिवसेनेकडे आहे. गेल्या निवडणुकीत शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी एकत्रित न लढल्यामुळे भाजपा ने शिट दिले होते. परंतु या निवडणुकीत महायुतीने एकत्रित लढवण्याचा निर्णय घेतल्याने ही जागा शिवसेनेच्या शिंदे गटाकडे येते की भाजपा कडे जाते या कडे सर्वांचे लक्ष लागून होते.
निवडणूक जाहीर झाल्यापासून डॉ.सुजय विखे यांनी संगमनेर मध्ये ठाण मांडून मोठ्या सभा घेतल्या होत्या. या सभेला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून संगमनेर मध्ये सुजय विखे विरुद्ध बाळासाहेब थोरात अशी लढत पाहायला मिळते का काय..? असे चित्र निर्माण झाले होते. परंतु आज शिवसेनेच्या शिंदे गटाकडून जाहीर झालेल्या यादीत भारतीय जनता पार्टीचे संगमनेर विधानसभा निवडणूक प्रमुख असलेले अमोल धोंडिबा खताळ यांना उमेदवारी देण्यात आली आहे. उद्या अमोल खताळ हे शिवसेनेत प्रवेश करणार आहे.
संगमनेर विधानसभा हा मतदारसंघ काँग्रेसचे ज्येष्ठनेते बाळासाहेब थोरात यांचा बालेकिल्ला समजला जातो. 1985 पासून या मतदारसंघावर थोरात यांचे वर्चस्व राहिले आहे. सलग आठवेळा मोठ्या मताधिक्याने निवडून येत त्यांनी विक्रम केलेला आसून यावेळी ते मोठ्या जोमाने पुन्हा एकदा विजयी गुलाल उधळण्याच्या तयारीत आहेत. परंतु
त्यांच्या या विजयाचा रथ रोखण्यासाठी विखे यांनी कंबर कसली असून त्यासाठी त्यांनी आपली सर्व ताकद पणाला लावली आहे.
लोकसभेच्या निवडणुकीत दक्षिण नगर लोकसभा मतदारसंघात खासदार निलेश लंके यांच्या विजयासाठी बाळासाहेब थोरात यांनी जोरदार प्रयत्न केले होते. त्यांचाच वचपा काढण्यासाठी विखे कुटुंबाने संगमनेर मतदार संघात ताकद पणाला लावली आहे. आता बाळासाहेब थोरात विरुद्ध अमोल खताळ ही लढत किती रंगतदार होईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.