मुंबई | वृत्तसंस्था
रेडिओ विविध भारतीवरील लोकप्रिय अनाऊंसर, निवेदक आणि टॉक शो होस्ट अमीन सयानी (वय ९१) यांचे निधन झाले. मंगळवारी संध्याकाळी हृदयविकाराच्या झटयाने त्यांची प्राणज्योत मालवली. अमीन सयानी यांचा मुलगा राजिल सयानी यांनी त्यांच्या निधनाचे वृत्त दिले आहे.
अमीन सयानी यांना हृदयविकाराचा झटका आल्यानंतर मुंबईतील एच. एन. रिलायन्स फाऊंडेशन रुग्णालयात त्यांना उपचारासाठी दाखल केले होते. उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. अमीन सयानी यांना उच्च रक्तदाब आणि वृद्धापकाळासंबंधी इतर आजार होते. मागील १२ वर्षांपासून ते पाठीच्या दुखण्याने त्रस्त होते. त्यामुळेच त्यांना चालण्यासाठी वॉकरचा आधार घ्यावा लागत होता.
रेडिओ सिलोन आणि विविध भारतीवर जवळपास ४२ वर्ष त्यांच्या हिंदी गाण्यांचा कार्यक्रम ’बिनाका गीतमाला’ने अनेक रेकॉर्ड मोडित काढले होते. अमीन सयानी यांना १९५२ मधील गीतमाला शोमधून मोठी लोकप्रियता मिळाली होती. त्यावेळी हा नंबर वन शो होता. १९५२ ते १९९४ पर्यंत शो तुफान गाजला. नंतर २००० ते २००१ आणि २००१ ते २००३ पर्यंत काही बदल करुन शो पुन्हा टेलीकास्ट करण्यात आला होता.
त्यांच्या आवाजाने त्यांनी प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले होते. अमीन सयानी यांच्या नावे तब्बल ५४ हजारांहून अधिक रेडिओ कार्यक्रम प्रोड्यूस करणे, त्याला आवाज देण्याचा रेकॉर्ड आहे. त्याशिवाय जवळपास १९ हजार जिंगल्सला आवाज देण्यासाठीही अमीन सयानी यांचे नाव लिम्का बुस ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंदवण्यात आले आहे.