spot_img
अहमदनगरनारा महायुतीचा, तयारी स्वबळाची!; विखे-जगताप एक्सप्रेस सुसाट, कोतकरांची महापालिकेला एण्ट्री

नारा महायुतीचा, तयारी स्वबळाची!; विखे-जगताप एक्सप्रेस सुसाट, कोतकरांची महापालिकेला एण्ट्री

spot_img

भाजप, राष्ट्रवादी, शिवसेनेच्या स्वतंत्र बैठका,  महाविकास आघाडीत शांतताच शांतता

सुनिल चोभे | नगर सह्याद्री:-
आगामी होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये महायुती एकत्रितपणेच निवडणुकांना सामोरे जाईल असे विधान मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी यापूवच केलेले आहे. तशा सूचनाही स्थानिक नेत्यांना दिल्या आहेत. त्यानुसार अहिल्यानगर शहरातील स्थानिक नेत्यांनी महापालिका निवडणुकीची तयारी चालविली आहे. राष्ट्रवादी अजित पवार गट, शिवसेना शिंदे गट व भाजपच्या झालेल्या स्वतंत्र बैठकांमध्ये महायुतीचा नारा देण्याबरोबरच स्वबळावर निवडणुका लढण्यासाठी तयारीला लागण्याच्या सूचना देखील कार्यकर्त्यांना देण्यात आल्या आहेत. तर दुसरीकडे महाविकाआघाडीच्या नेत्यांकडून महापालिका निवडणुकीसाठी जोरदार हालचाली चालू आहेत.

सर्वोच्य न्यायालयाने चार महिन्यांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे निर्देश दिल्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या हालचालींना वेग आला आहे. अ, ब, क वर्गांतील महापालिकांची प्रारूप प्रभाग रचना शनिवारी जाहीर झाली आहे. अहिल्यानगर महापालिकेची प्रारूप प्रभाग रचना येत्या 03 ते 15 सप्टेंबर दरम्यान जाहीर होणार आहे. त्यानंतर प्रभागातील आरक्षण जाहीर होणार आहे. त्यामुळे प्रारूप प्रभाग रचनेकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. दुसरीकडे महापालिकेवर झेंडा फडकविण्यासाठी महायुतीसोबरच महाविकास आघाडीनेही तयारी चालविली आहे.

केंद्रात व राज्यात महायुतीचे सरकार असल्यामुळे स्थानिक पातळीवरील इच्छुकांचा ओढा महायुतीमध्ये प्रवेश करण्याकडे असल्याचे दिसून येतेय. परंतु, महायुतीमध्ये स्थानिक पातळीवरील अनेक मातब्बर नेत्यांची फौज अगोदरच दंड थोपटून मैदानात उतरण्यासाठी सज्ज आहे. त्यामुळे उमेदवारी नेमकी द्यायची कोणाला असा प्रश्न नेतेमंडळींसमोर उभा राहू शकतो. नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यामध्ये निवडणुका होतील असा अंदाज बांधला जात असून त्या अनुषंगाने तयारी चालू आहे. नगर शहरात राष्ट्रवादी (अजित पवार), शिवसेना (एकनाथ शिंदे) व भाजपची ताकद मोठी असल्याने जागा वाटपाचे गणित कसे जुळेल? की स्वबळावर नशीब आजमवणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

राष्ट्रवादी, भाजपची मोठी ताकद
गत महापालिका निवडणुकीमध्ये सर्वाधिक 23 जागा अखंड शिवसेनेला मिळाल्या होत्या. त्याखालोखाल 19 जागा राष्ट्रवादीला मिळाल्या होत्या. 15 जागा मिळवून भाजप तीन नंबरचा पक्ष ठरला होता. अहिल्यानगर शहरामध्ये सध्या मात्र अजित पवार यांच्या राष्ट्रवादीची ताकद मोठी आहे. विधानसभा निवडणुकीत तिसऱ्यांदा गुलाल घेत आमदार संग्राम जगताप राष्ट्रवादीची ताकद दाखवून दिली आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीची धुरा शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर यांच्या खांद्यावर आहे. भाजपची धुरा नवनिर्वाचित शहर जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. तर शिवसेना शिंदे सेनेची धुरा सचिन जाधव यांच्या खांद्यावर आहे. बारस्कर, जाधव, मोहिते यांच्यावर पक्षवाढीची जबाबदारी सोपविण्यात आली असून ते पक्षवाढीसाठी योगदान देत आहेत.

विखे-जगताप एक्सप्रेस सुसाट
गेल्या काही वर्षांपासून अहिल्यानगर शहरामध्ये माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील व आमदार संग्राम जगताप यांची सहमती एक्सप्रेस चांगलीच सुसाट धावतेय. याचा फायदा आमदार संग्राम जगताप यांना विधानसभा निवडणुकीत झाल्याचे पहावयास मिळाले. परंतु, लोकसभा निवडणुकीत अनेकांनी भाजपचे उमेद्वार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या विरोधात काम केले. त्याचा फटका विखे पाटलांना बसला. त्याचा वचपा विखे पाटलांनी विधानसभा निवडणुकीत काढत अनेकांना घरचा रस्ता दाखवला. आता होऊ घातलेल्या महापालिका निवडणुकीमध्ये विखे-जगताप अनेकांची विकेट घेतील असा अंदाज राजकीय वर्तुळातून बांधला जात आहे.

शिवसेना रिपब्लिकन सेनेची युती
महाराष्ट्रात युती झालेल्या शिवसेना व रिपब्लिकन सेनेच्या पदाधिकाऱ्यांचा संवाद मेळावा शहरात नुकताच पार पडला. या मेळाव्यात दोन्ही पक्षांतील पदाधिकाऱ्यांनी युतीचे घटक पक्ष म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व निवडणुकांना एकजुटीने सामोरे जाण्याचा व सर्व उमेदवार बहुमताने निवडून आणण्याचा निर्धार केला आहे. या मेळाव्यामध्ये शहर प्रमुख सचिन जाधव यांनी महापालिकेवर भगवा आणि निळा झेंडा फडकवणार असल्याचेही सांगितले. तर जिल्हाप्रमुख अनिल शिंदे यांनी या युतीच्या माध्यमातून महायुतीचे उमेदवार बहुमताने निवडून येणार असल्याचे सांगितले आहे.

कोतकरांची एण्ट्री, समर्थकांना ताकद
तब्बल 10-12 वर्षानंतर गेल्या गणपती विसर्जनाची जंगी मिरवणूक काढत माजी महापौर संदीप कोतकर समर्थकांनी आपली ताकद दाखवून दिली. तेव्हापासून नगरच्या राजकारणात कोतकर पुन्हा एण्ट्री करणार असल्याचे बोलले जात आहे. दिवाळीनंतर होणाऱ्या महापालिका निवडणुकीत कोतकर व समर्थक पूर्ण ताकदीने महापालिका निवडणूक लढवतील असा राजकीय अंदाज बांधला जात आहे. त्या अनुषंगाने कोतकर समर्थकांनी तयारी सुरू केली असल्याचे दहीहंडी उत्सव व बैलपोळा मिरवणुकीतून सणातून दिसून आले आहे. महापालिका निवडणुकीत कोतकर पुन्हा एकदा एण्ट्री करतील, तसेच समर्थकांना ताकद देतील देखील अंदाज आहे.

महाविकास आघाडीची धुरा थोरात, लंके, गाडेंच्या खांद्यावर
गत महापालिका निवडणुकीमध्ये शिवसेनेने सर्वाधिक 23 जागा जिंकल्या होत्या. परंतु, शिवसेनेचे दोन शकले झाल्याने अनेकांनी ठाकरे सेनेला जय महाराष्ट्र करत शिंदे सेनेत प्रवेश केला. त्यामुळे बोटावर मोजण्याइतकेच नगरसेवक अन पदाधिकारी ठाकरे सेनेत सध्या आहेत. शहर प्रमुख पदाची धुरा किरण काळे यांच्या खांद्यावर आहे. तर महाविकास आघाडीतील काँग्रेस शहर जिल्हाध्यक्षपदाची धुरा नुकतीच ज्येष्ठ नेते दीप चव्हाण यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीची धुरा माजी महापौर अभिषेक कळमकर यांच्या खांद्यावर आहे. ठाकरे सेनेचे जिल्हाप्रमुख प्रा. शशिकांत गाडे व खासदार नीलेश लंके यांना मानणारा मोठा वर्ग अहिल्यानगर शहरात आहे. त्यामुळे महापालिका निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीची धुरा काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात, खासदार लंके व जिल्हाप्रमुख प्रा. गाडे यांच्या खांद्यावर असणार आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

माझ्या नादी लागलीस तर तुझं सगळं गबाळ उचकीन; चित्रा वाघ यांच्या आरोपांना मनोज जरांगेंचे प्रत्युत्तर

Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले आहे....

ग्रामदैवत विशाल गणेश मंदिरात सोमनाथ घार्गे यांच्या हस्ते बुधवारी ‌‘श्रीं‌’ची प्राणप्रतिष्ठा

अहिल्यानगर | नगर सह्याद्री:- शहराचे ग्रामदैवत असलेल्या माळीवाडा येथील श्री विशाल गणेश मंदिर येथे गणेशोत्सवानिमित्त...

बाप्पाच्या आगमनापूर्वी पावसाचा जोर वाढला; 12 जिल्ह्यांसाठी मुसळधार पावसाचा अलर्ट

मुंबई | नगर सह्याद्री गेल्या चार दिवसांच्या विश्रांतीनंतर मुंबई आणि पश्चिम उपनगरात पुन्हा एकदा जोरदार...

शहरातील अनधिकृत थडगे तात्काळ हटवा; कोणी केली मागणी?

सकल हिंदू समाज बांधवांची जिल्हा प्रशासनाकडे निवेदनाद्वारे मागणी अहिल्यानगर | नगर सह्याद्री रस्त्याच्या मधे येणारी धार्मिक...