अहिल्यानगर । नगर सहयाद्री :-
शहरातील टांगे गल्ली, अमरधाम रस्ता येथील शनिमारूती मंदिराजवळ दरोड्याच्या तयारीत असलेल्या पाच जणांच्या टोळीवर कोतवाली पोलिसांनी छापा टाकत तिघांना ताब्यात घेतले. दोन जण अंधाराचा फायदा घेत पसार झाले असून, पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या आदेशानुसार, बुधवारी रात्री 8 वाजल्यापासून गुरूवारी सकाळी 8 वाजेपर्यंत एका पथकाची रात्रगस्त सुरू होती.
यावेळी, गुन्हे शोध पथक व रात्रगस्त पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, दरोड्याच्या तयारीसाठी काही जण शनिमारूती मंदिराजवळ थांबल्याचे समजले. त्यानुसार, पोलीस उपनिरीक्षक शितल मुगडे, पोलीस अंमलदार लक्ष्मण बोडखे, रामनाथ हंडाळ, गुन्हे शोध पथकातील दीपक रोहकले, तानाजी पवार, सुरज कदम, शिरीष तरटे आणि अन्य अंमलदारांनी घटनास्थळी छापा टाकला.
पोलीस पाहताच संशयितांनी पळण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी वेळीच कारवाई करत तिघांना पकडले. यामध्ये विवेक संतोष अमृते (वय 20, रा. लोंढेनगर, शिवाजीनगर) याच्यासह सिध्दार्थनगर आणि शिवाजीनगर परिसरातील दोन अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. पळून गेलेल्या दोघांपैकी एक जण वारूळाचा मारूती मंदिराजवळ, नालेगाव येथील असून दुसर्याचे नाव समजू शकलेले नाही.
पाच जणांविरूध्द कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पकडलेल्या तिघांच्या ताब्यातून लोखंडी गज, लाकडी काठ्या, 20 फूट लांबीची सुतळी दोरी, मिरची पावडर, दोन दुचाकी, तीन मोबाइल फोन आणि रोख रक्कम असा एकूण एक लाख 31 हजार 20 रूपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.