अहमदनगर । नगर सहयाद्री
जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील गव्हाणवाडी परिसरातील ‘हॉटेल प्रतीक’ वर पोलिसांनी छापा टाकत वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी कुंटणखाना चालविणाऱ्या महिलेला तसेच हॉटेल मालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. छाया शशिकांत चव्हाण (रा. शिरूर), हॉटेल मालक पप्पू राक्षे (रा. गव्हाणवाडी) अशी आरोपींची नावे आहेत. लायसन ऑफिसर संस्था फ्रीडम फॉर्म, पुणे येथील मोजेस प्रभाकर कसबे (वय ३९) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे.
अधिक माहिती अशी: पोलिसअधीक्षक राकेश ओला यांना गव्हाणवाडी परिसरातील ‘हॉटेल प्रतीक’ मध्ये देहव्यापार सुरू असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पुणे येथील महिलांसाठी काम करणाऱ्या लायसन ऑफिसर संस्था फ्रीडम फॉर्म, पुणे यांच्यासह पोलिस पथकाने छापा घातला.
तेथे छाया शशिकांत चव्हाण ही महिला हॉटेल मालकाच्या मदतीने परराज्यातील महिलांच्या साहाय्याने वेश्या व्यवसाय करीत असल्याचे समोर आले. पोलिसांनी छापा घालून पश्चिम बंगालमधील महिलेची सुटका केली. महिलेसह हॉटेल मालकावर बेलवंडी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.