Crime News: उत्तर प्रदेशाच्या औरेया जिल्ह्याीतील बिधूनामध्ये रक्षाबंधनाच्या रात्री 33 वर्षीय तरुणाने दारुच्या नशेत १४ वर्षीय चुलत बहिणीवर अत्याचार करून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. तरुणाच्या संतापजनक कृत्याने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
औरेयाच्या बिधूना पोलीस स्टेशनच्या हद्दीत बहीण-भावाच्या नात्याला काळीमा फासणारी घटना घडली. रक्षाबंधनाच्या दिवशी तरुणी काकांकडे जाऊन घरी परतली. घरात तरुणी एकटी होती. तिची आई आणि बहीण नोएडा येथे गेल्या होत्या. तरुणीचे वडील घराच्या बाहेर असलेल्या झोपडीत झोपले होते.
तरुणीचा चुलत भाऊ शेतात शौचालयासाठी गेला. त्यानंतर परतताना तरुणीच्या खोलीत घुसला. खोलीत शिरल्यानंतर तरुणीवर अत्याचार करायला सुरुवात केली. तरुणी चुलत भावाचा विरोध करत होती. ती जोरजोरात ओरडू लागली. मात्र, नराधम भावाने अत्याचारानंतर रागाच्या भरात बहिणीची गळा दाबून हत्या केली. त्यानंतर हळूच घरात जाऊन झोपला
दुसऱ्या दिवशी सकाळी वडिलांनी मुलीला आवाज दिला. पण तिने तिच्या खोलीचा दरवाजा उघडला नाही. त्यानंतर शेजारांच्या मदतीने दरवाजा उघडला. त्यावेळी मुलगी फाशी घेतलेल्या अवस्थेत आढळली. तरुणीच्या खोलीत रक्ताचे डाग होते. त्यामुळे पंचनाम्यासाठी आलेल्या पोलिसांना हत्येचा संशय आला.
पोलिसांनी कुटुंबातील सदस्यांची विचारपूस सुरु केली. सूरजीत कुटुंबीयांच्या वतीने पोलिसांना जबाब देऊ लागला. सूरजीत घटनास्थळी उपस्थित राहून संपूर्ण तपासावर लक्ष ठेवत होता. त्यामुळे पोलिसांना सूरजीतवर संशय बळावला. पोलिसांनी पुढील तपासासाठी तरुणीचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवला.
तसेच पोलिसांनी घटनास्थळावरून कपडे फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवले. त्यानंतर तरुणीवर अत्याचारानंतर गळा दाबून हत्या झाल्याचे पोस्टमार्टम अहवालात उघड झाले. त्यानंतर पोलिसांनी सूरजीतच्या मुसक्या आवळल्या. पोलिसांच्या चौकशीत सूरजीतने बहिणीची अत्याचार करून हत्या केल्याचे कबूल केले. सूरजीच्या कृत्याने संपूर्ण गावात खळबळ उडाली आहे.