क्लासिक ब्रीजचे नाशिकमधील कार्यालयच निघाले बोगस| सेंट्रिंगवाल्यासह चप्पल दुकानदाराने सात महिन्यांपूव शेवगाव पोलिसांकडे जबाब नोंदविला | सात महिन्यांत काहीच हालचाल नाही.
पाठलाग बातमीचा । शिवाजी शिर्के
कंपनी कायद्यानुसार नोंदणीकृत केलेल्या कंपनीत घरचे आणि नातेवाईक संचालक असताना व त्या कंपनीला ठेवी जमा करण्याचा कोणताच अधिकार नसताना अत्यंत थंड डोक्याने संदीप थोरात याने नगरसह सोलापूर, नाशिक, मुंबई, पुणे, सांगली, कोल्हापूर येथील हजारो गुंतवणूकदारांना कोट्यवधी रुपयांचा वेगवेगळ्या कंपन्यांच्या नावाखाली गंडा घातला. गुंतवणूकदारांना गंडविताना त्याने बेरेोजगारांना देखील गंडा घालण्याचे काम केले. हे सारे होत असताना आणि हजारो ठेवीदार फसवले जात असताना पोलिसांकडे तक्रारी झाल्यानंतरही संदीप थोरात याच्या विरोधात काहीच भूमिका घेतली जात नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. शेवगावमध्ये जवळपास चारशे कोटींचा गंडा घालणाऱ्या संदीप थोरात याच्या क्लासीक ब्रीज या कंपनीत गुंतवणुकदारांना अत्यंत बेमालमूपणे चुना लावला गेला. कंपनीच्या कार्यालयावर जीएसटीच्या अधिकाऱ्यांची रेड झाली असल्याचा कांगावा करण्यात आला. मात्र, ही रेडच नव्हती. संदीप थोरात याच्या पंटरांनी खासगी वाहनाला जीएसटी कार्यालयाचे स्टीकर लावून अत्यंत पद्धतशिरपणे राबविलेला हा फंडा होता. रेड पडली असल्याचे नाटक रंगवताना या अधिकाऱ्यांनी कार्यालयाचे शटर लावून घेतले. आतमध्ये जाऊन त्यांनी संगणकासह अन्य महत्वपूर्ण कागदपत्रे तपासणीसाठी जीएसटी कार्यालयात घेऊन जात असल्याचे दाखवले. सर्व साहित्य ज्या गाडीत भरुन नेण्यात आले ते वाहन (एमएच 16 बीवाय 9270) इनोव्हा क्रीस्टा विकास काळे या व्यक्तीचे आहे. त्या वाहनाचा अथवा वाहन मालकाचा जीएसटी कार्यालयाशी काहीच संबंध नव्हता आणि नाही. माहिती अधिकारात आम्ही मिळविलेल्या माहितीनुसार ही माहिती समोर आली आहे. शेवगावमधील गोरख वाघमारे यांनी आपली फसवणूक झाली असल्याचा अर्ज दिल्यानंतर शेवगाव पोलिसांनी दि. 18 ऑगस्ट 2024 रोजी त्यांचा जबाब नोंदविला. मात्र, पुढे काहीच कारवाई केली नाही. सात महिन्यात संदीप थोरातला शेवगाव पोलिसांनी अभय का दिले हा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होतो आहे. दरम्यान, संदीप थोरात याने नाशिकमधील ज्या पत्त्यावर क्लासीकब्रीज या कंपनीचे कार्यालय असल्याचे जाहीर केले होते, त्या पत्यावर ते अस्तीत्वातच नसल्याचेही आम्ही केलेल्या स्टींग ऑपरेशनमधून समोर आले आहे. याचाच अर्थ कलकत्ता, मुंबईपाठोपाठ नाशिकचे कार्यालय देखील कागदावरच दाखवले हे स्पष्टपणे समोर आले आहे.
गुंतवणूकदारांना संध्याकाळी बोलावले अन् त्याआधीच बोगस जीएसटी टीमची रेड टाकली!
शेवगावमध्ये गुंतवणूकदार मोठ्या प्रमाणात आकषत झाले होते. मात्र, त्यांना जानेवारीपासून ते मे अखेरपर्यंत परतावा देण्यास टाळाटाळ होत होती. त्यामुळे गुंतवणूकदार हवालदिल झाले होते आणि त्यांच्याकडून वारंवार त्यांच्या रकमेची मागणी होत होती. त्यामुळे संदीप थोरात आणि त्याच्या टोळीने शक्कल लढवली. दि. 1 जून 2024 रोजी गुंतवणूकदारांना संस्थेचे नवनाथ लाडगे व सचिन शेलार यांनी परतावा देण्यात येणार असून सर्वांनी संध्याकाळी पाच वाजता कार्यालयात यावे असे फोन केले. ठेवीदारही त्या फोनने सुखावले. पाच वाजता आपली रक्कम मिळेल या आशेने सर्व गुंतवणूकदार सुखावले असताना दुपारी साडेतीनच्या दरम्यान संस्थेच्या कार्यालयासमोर जीएसटी कार्यालय आणि अधिकारी असे स्टीकर असलेली इनोव्हा क्रीस्टा कंपनीची अलिशान गाडी (एमएच 16 बीवाय 9270) धडकली. त्या गाडीतून सुटाबुटातील पाचजण अधिकारी शोभतील अशा थाटात कार्यालयात दाखल झाले. आत जाताच त्यांनी कार्यालयाचे शटर आतून ओढून घेतले. बाहेर थांबलेल्या एकाकडून कार्यालयात आत जाऊ पाहणाऱ्यांना ‘जीएसटीच्या अधिकाऱ्यांची रेड पडली आहे’, असे सांगितले जात होते. पाच वाजण्याच्या आत ही आतमध्ये गेलेली जीएसटीची बनावट अधिकाऱ्यांची टीम शटर उघडून बाहेर आली. त्यांच्या हातात काही बॉक्स, संगणक आणि कागदपत्रे भरलेली बॅग होती. हे सर्व साहित्य त्यांनी गाडीत टाकले आणि ही गाडी तेथून नगरच्या दिशेने रवाना झाली. संस्थेतील कर्मचाऱ्यांनी लागलीच जीएसटी अधिकाऱ्यांची रेड पडली असल्याचा कांगावा केला. मात्र गुंतवणूकदारांनी अधिक चौकशी केली असता ही रेडच बनावट होती आणि रेडसाठी आलेले सारे पंटर संदीप जाधव याचेच होते असे उघड झाले असल्याचा जबाब गोरख वाघमारे याने पोलिसांसमोर नोंदविला.
संचालकमंडळाचा खुलासा हा फक्त वेळकाढूपणाचा आणि दिशाभूल करणारा!
कंपनी असताना बँकींग लायसन्स असल्याचे भासविणाऱ्या संदीप थोरात याने मोठा गमतीदार खुलासा केला आहे. त्यात त्याने म्हटले आहे की, कंपनीचे भागधारकांनी केलेल्या मागणीनुसार कंपनीच्या संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये कंपनीने भागधारकांच्या हिताकरिता महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे. (वास्तविक कंपनीच्या भागधारकांची कोणतीही वार्षिक सभा त्याने घेतली नाही. जर त्याने दाखवलीच असेल तर त्याच्या सात- आठ पंटरांच्या नावाने जे भाग (शेअर) दाखवले असतील त्यांची ती सभा असेल. त्याच्याशी गुंतवणूकदारांचा काडीचाही संबंध नाही.) त्या खुलाशात तो पुढे म्हणतो की, भागधारकांना यापूव अदा केलेली रक्कम वजा जाता देय रक्कम खालीलप्रमाणे अदा करण्याचे कंपनीच्या संचालक मंडळाने ठरविलेले आहे त्याचा तपशील खालीलप्रमाणे- 1) भागधारकांच्या भाग रकमेच्या 30% रक्कम नोव्हेंबर 2024 या महिन्यामध्ये. 2) भागधारकांच्या भाग रकमेच्या 30% रक्कम डिसेंबर 2024 या महिन्यामध्ये. 3) भागधारकांच्या भाग रकमेच्या 30% रक्कम जानेवारी 2025 या महिन्यामध्ये. 4) भागधारकांच्या भाग रकमेच्या 10% रक्कम फेब्रुवारी 2025 या महिन्यामध्ये. वरीलप्रमाणे रकमा भागधारकांना अदा करण्याचे संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये ठरलेले असल्याचे त्याने खुलासा वजा नोटीसीत म्हटले होते. ही नोटीस दि. 18 ऑगस्ट 2024 रोजी दैनिक पुण्यनगरीच्या नाशिक आणि नगर आवृत्तीत प्रकाशित करण्यात आली होती. नोटीसीत जाहीर केल्यानुसार कोणत्याही गुंतवणूकदाराला कोणतीही रक्कम मिळाली नाही.
आर्थिक गुन्हे शाखेबाबतच अनेकांना शंका!
नगरच्या अर्थिक गुन्हे शाखेकडे अर्ज आल्यानंतर या शाखेतील काहींकडून संबंधितांकडे तोडपाणी केल्या जात असल्याच्या तक्रारी नवीन नाहीत. आर्थिक गुन्हे शाखेची जबाबदारी ज्यांच्यावर आहे ते अधिकारीही आलेल्या तक्रारी आणि त्याबाबत कोणतीही माहिती देण्यास टाळाटाळ करत असतात. संदीप थोरात याच्याकडून झालेल्या फसवणुकीबाबत राहुल पवार, विकास दळवी रा. पवारवाडी, सुपा ता. पारनेर यांनी तक्रार केली असताना याबाबत महिना उलटून देखील कोणतीच कारवाई झाली नाही. गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांना नक्की काय अभिप्रेत आहे असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे.
संदीप थोरात नगर सोडून पळून जाण्याच्या तयारीत!
गुंतवणूकदारांसह आरोग्यदूत भरतीच्या नावाखाली कोट्यवधींना चुना लावणाऱ्या संदीप थोरात याच्या विरोधात तक्रारींची संख्या वाढत चालली आहे. आता सदर प्रकरणात पोलिस अधीक्षकांनी खमकी भूमिका घेण्याचे ठरवले असल्याचे समोर येत आहे. आपल्या विरोधात कोणत्याही क्षणी गुन्हा दाखल होऊ शकतो याची जाणिव झाल्याने संदीप थोरात हा कोणत्याही क्षणी नगर सोडण्याच्या तयारीत असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.
वर्तमानपत्रात कंपनीच्या वतीने जाहीर नोटिशीद्वारे दिलेला खुलासाही निघाला फसवा!
संदीप थोरात याने नगरमधील एका ज्येष्ठ विधीज्ज्ञामार्फत जाहीर नोटीस प्रसिद्ध केली. त्या नोटीसीत म्हटल्यानुसार क्लासिक ब्रीज मनी सोल्युशन्स प्रा. ली. या कंपनीचे भागधारकास या जाहीर नोटीसद्वारे कळविण्यात येते की. आमची अशिल कंपनी ही गुंतवणूक तसेच इतर आर्थिक नियोजन संदर्भात सल्ला देणे आणि त्यासंबंधी इतर कामे करते. आमची अशिल कंपनी ही भारत सरकारचे मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेयर्स (एमसीए) द्वारे कंपनी कायदा 2013 अंतर्गत नोंदणी झालेली कंपनी आहे. सदर कंपनीचे मुख्य कार्यालय नाशिक येथे कार्यरत असून या कंपनीची शेवगाव जिल्हा अहमदनगर येथे शाखा आहे. शेवगाव तालुक्यातील अनेक भागधारकांनी या शाखेमधून कंपनीचे अग्रणी भाग (झीशषशीशपलश डहरीशी) खरेदी केलेले आहेत. सदर भागांवरील कंपनी कायद्याप्रमाणे तसेच कंपनीच्या नफा तोटा पत्रकाप्रमाणे नफ्यातून होणारा परतावा तसेच मुदतपूत नंतरची भाग रक्कम परत करण्यासाठी प्रत्येक भागधारकाला ठराविक मुदत ठरलेली आहे. मुदतपूत होणाऱ्या भागधारकांची कंपनीच्या कायद्याच्या नियमाप्रमाणे होणारी रक्कम भागधारकांच्या मागणीवरून संबंधित भागधारकांना यापूव अदा करण्यात आलेली असल्याचे त्यात म्हटले आहे. मात्र, प्रत्यक्षात त्यानुसार कोणताही परतावा कोणालाही मिळालेला नाही.
एसपी साहेब, खमकी भूमिका घ्या अन् गुंतवणूकदारांना न्याय द्या!
शेवगावसह नगर शहर आणि नगर तालुका, पारनेर येथील गुंतवणूकदारांना टोप्या घालणाऱ्या संदीप थोरात याच्या विरोधात अनेक ठिकाणाहून तक्रारी आल्या. त्या- त्या पोलिस ठाण्यात तक्रारी आल्यानंतर त्यांच्याकडून आम्हाला वरिष्ठांची परवानगी लागेल असे उत्तर दिले गेले. हे वरिष्ठ म्हणजे नक्की कोण आणि त्यांना परवानगी द्यायला किती महिने लागू शकतात हे आता पोलिस अधीक्षकांनीच जाहीर करण्याची गरज आहे. गुंतवणूकदार हवालदील झाले आहेत, काहींचे प्राण गेले आहेत तर काही दवाखान्यात दाखल आहेत. संदीप थोरात प्रकरणात खमकी भूमिका घेण्याची गरज आहे.
जीएसटीचे पत्रक चिकटवून तोतया अधिकारी पसार झाले!
एमएच 16 बीवाय 9270 या वाहनातून बाहेर पडताना संस्थेशी संबंधित कागदपत्रे व अन्य साहित्य सोबत सोबत घेण्यात आली. यानंतर ही जीएसटी अधिकाऱ्यांची कथीत टीम गाडीत बसून रवाना होण्यापूव त्यांनी संस्थेचे शेटरवर जीएसटीचे पत्रक चिटकाविले. यानंतर या संस्थेशी संबंधित असणाऱ्या नवनाथ लांडगे, सचिन शेलार, दिलीप कोरडे यांचे फोन बंद झाले. जीएसटी टीमच्या नावाखाली फसवणूक झाल्याची खात्री पटल्यानंतर गुंतवणूकदारांनी त्याच ठिकाणी कपाळ झोडले तर काहींनी हंबरडा फोडला.
शेवगाव मोहीम फत्ते होताच पंटरांना जंगी पाट!
शेवगावमध्ये जीएसटी अधिकारी म्हणून रेड टाकण्यासाठी संदीप थोरात याने त्याच्या अत्यंत विश्वासातील सात जणांची निवड केली होती. त्याशिवाय अलिशान गाडी देखील वापरली होती. शेवगाव मोहीम फत्ते होताच या सर्व पंटरांना संदीप थोरात याने नगर शहरातील एका नामंकीत हॉटेलमध्ये साग्रसंगीत पाट दिल्याची माहिती पुढे आली आहे.
दोन योजना गळी उतरविल्या अन् 15 लाखांना टोपी घातली!
गोरख वाघमारे यांचा दि. 18 ऑगस्ट 2024 रोजी शेवगाव पोलिसांनी नोंदविलेला जबाब ‘नगर सह्याद्री’च्या हाती आला आहे. त्या जबाबात त्यांनी म्हटले आहे की, संस्थेत आर्थिक गुंतवणुक केल्यास 30 टक्के मासीक परतावा देण्याचे आश्वासन देवुन त्यांचे संस्थेत गुंतवणुक करण्यास संदिप सुधाकर थोरात, दिपक राऊसाहेब कराळे यांनी सांगितले तसेच सदर संस्थेत 6 ते 12 महीने मुदतीच्या दोन योजना असुन आंम्हाला त्यापैकी एका योजनेत गुंतवणुक करा असे सांगितले तसेच सदर संस्थेत कोणत्याही प्रकारचा गैरव्यवहार होणार नाही याची हमी मला दिली. तसेच गुंतवणुकीबाबत आम्ही तुम्हाला रकम रुपये 1000/- रूपयेची नोटरी करून देतो तसेच कंपनीचे शेअर सर्टिफिकेट तसेच क्लासीक बीच या संस्थेच्या नावाचा अमाउंट चेक देता असे सांगीतले. या कागदोपत्रावर विश्वास ठेवुन मी दिनांक 12 जानेवारी 2024 रोजी रकम रुपये 5,00,000/- रुपये एका वर्षाचे मुदतीवर 15 टक्के मासीक परतावा देण्याचे अटीवर माझे आयडीबीआय बँकेचे चेक क्रमांक 184739 अन्वये आरटीजीएस व्दारे क्लासीक बीज मनी सोल्युशन प्रा.ली. या संस्थेत गुंतवणुक केली होती तर दिनांक 2 फेब्रुवारी 2024 रोजी सहा महीन्याचे मुदतीच्या योजनेत 15 टक्के मासीक परतावा मिळण्याचे अटीवर आरटीजीएस द्वारे आयडीबीआय चेक क्रमांक 184741 अन्यये आरटीजीएस व्दारे क्लासीक बीज मनी सोल्युशन प्रा.ली. या संस्थेत पुन्हा यम रूपये 5 लाख रुपयांची गुंतवणुक केली होती. त्यानंतर दिनांक 16/03/2024 रोजी आयडीजीआय बँकेचे चेक क्रमांक 184744 अन्यये आरटीजीएस व्दारे क्लासीक बीज मनी सोल्युशन प्रा.ली. या संस्थेत 5 पाच लाख रुपयांची गुंतवणुक सहा महीन्याकरीता 19 टक्के परतावा मिळण्याच्या अटीवर सहा महीन्याकरिता केली होती. मला काहीएक परताव सदर संस्थेकडुन मिळालेला नाही.
क्लासिक ब्रीजच्या अमोल खरात याने केली दिशाभूल!
क्लासीकब्रीजचा मुख्य कार्यकारी अधिकारी या नात्याने अमोल खरात याने गुंतवणूकदारांना दि. 18 जून 2024 रोजी पत्र लिहीले. त्यात त्याने कंपनीची सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. पैसे मिळणार याची खात्री त्याने त्यात दिली. जीएसटी ऑफीसच्या नावाखाली त्याने बाजू मारली. मुंबई- नाशिक कार्यालय सुरु झाले असल्याने सर्वाचे पैसे मिळतील असे सांगताना काही टप्पे पाडून ते मिळतील असे सांगितले. त्यानुसार दि. 30 जुलै 2024 रोजी आपल्याला पहिला हप्ता मिळेल. तसेच प्रत्येक महिन्याच्या 30 तारखेला मुदतीच्या 20 टक्के रक्कम तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने जमा होईल. याबाबत आपले सहकार्य असावे. शेवटच्या हप्त्यात व्याजाचे नियोजन करु, अशी लेखी खात्री आम्ही या पत्राद्वारे आपणास देत आहोत. आमच्या जीएसटीच्या कायदेशीर अडचणी मिटायला अजून 15 ते 20 दिवस लागतील. त्यानंतर खाते सुरू होतील. त्यामुळे मुद्दामहून आम्ही 15-20 दिवस जास्तीची मुदत तुम्हाला देत असल्याचे त्याने दिलेल्या लेखी पत्रात म्हटले. मात्र, प्रत्यक्षात त्यानुसार एकाही गुंतवणूकदाराला रक्कम ते देऊ शकले नाहीत.
शेवगावमध्ये जाहिरात पत्रके वाटली अन् गुंतवणूकदार फसले!
सेंट्रीग प्लेट भाड्याने देण्याचे काम करणारे गोरख वाघमारे व त्यांचा मुलगा यांचे चप्पल विक्रीचे दुकान आहे. जानेवारी 2024 मध्ये त्यांना शेवगाव शहरातील आखेगाव रस्त्यावर क्लासीक ब्रीज सोल्युशन प्रा. लि. नावाने शाखा सुरू झाल्याचे त्यांच्या मित्रांकडून समजले. त्याच दरम्यान, त्यांना शहरातील विविध रस्त्यांवर या कंपनीच्या नावाने गुंतवणुकीवर मासिक 10 ते 15 टक्के परतावा मिळणार, असा आशय असणारी पत्रके वाचण्यास भेटली. चांगला परतावा मिळत असल्याचे पाहून ते क्लासीक बीज मनी सोल्युशन प्रा.ली.पा संस्थेत चौकशीसाठी गेले. त्यावेळी कार्यालयात संदिप सुधाकर थोरात, दिपक राऊसाहेब कराळे असे दोन संचालक तसेच अमोल सीताराम खरात, मुख्य कार्यकारी अधिकारी नाशिक आणि दिलीप तात्याभाऊ कोरडे शेवगाव येथील संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, तसेच सदर संस्थेचे दोन कर्मचारी नवनाथ सुभाष लांडगे व सचिन सुधाकर शेलार हे सर्व भेटले.
नाशिकला बोलावले पण थोरात अन् कराळे पळून गेले!
शेवगावमधील गुंतवणूकदारांनी पोलिस ठाण्यात जाण्याची तयारी केल्याचे समोर येताच संदीप थोरात याने यातील काहींना नाशिक येथील कार्यालयात बोलावले. त्यानुसार हे सारे तेथे गेले. मात्र, त्या कार्यालयात कोणीही आढळून आले नाही. संदीप थोरात आणि दिपक कराळे हे दोघेही तेथून पळून गेल्याचे सांगण्यात आले असल्याचे पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटले आहे.
शेवगाव मोहीम फत्ते होताच पंटरांना जंगी पार्टी!
शेवगावमध्ये जीएसटी अधिकारी म्हणून रेड टाकण्यासाठी संदीप थोरात याने त्याच्या अत्यंत विश्वासातील सात जणांची निवड केली होती. त्याशिवाय अलिशान गाडी देखील वापरली होती. शेवगाव मोहीम फत्ते होताच या सर्व पंटरांना संदीप थोरात याने नगर शहरातील एका नामंकीत हॉटेलमध्ये साग्रसंगीत पार्टी दिल्याची माहिती पुढे आली आहे.
नाशिकला बोलावले पण थोरात अन् कराळे पळून गेले!
शेवगावमधील गुंतवणूकदारांनी पोलिस ठाण्यात जाण्याची तयारी केल्याचे समोर येताच संदीप थोरात याने यातील काहींना नाशिक येथील कार्यालयात बोलावले. त्यानुसार हे सारे तेथे गेले. मात्र, त्या कार्यालयात कोणीही आढळून आले नाही. संदीप थोरात आणि दिपक कराळे हे दोघेही तेथून पळून गेल्याचे सांगण्यात आले असल्याचे पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटले आहे.