आम्ही सर्व अक्षय कर्डिलेंच्या पाठिशी ः प्रा. राम शिंदे/ सहकार सभागृहातील सर्वपक्षीय शोकसभेत स्व. आमदार शिवाजीराव कर्डिले यांना श्रद्धांजली
अहिल्यानगर | नगर सह्याद्री
जिल्हा बँकेचे अध्यक्ष तथा आमदार शिवाजीराव कर्डिले यांचा दूधवाला आमदार ते मंत्री असा राजकीय संघर्षमय प्रवास अविस्मरणीय आहे. प्रस्थापितांचा विरोध पत्कारत सर्वसामान्यांची नाळ स्व. आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी तुटू दिली नाही. ३०-३५ वर्ष जनतेची अहोरात्र सेवा केली. शिवाजीराव कर्डिले यांचा वसा आणि वारसा आता चिरंजीव अक्षय कर्डिले यांना चालवायचा आहे. त्यांचे आचार विचार घेऊन पुढे चालायचे आहे. त्यामुळे दुःख विसरुन त्यांनी जबाबदारी स्विकारावी. आम्ही सर्व जण अक्षय कर्डिले यांच्या पाठिशी ठामपणे उभे आहोत असे उद्गार विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी काढले.
माजी मंत्री, जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष, आमदार शिवाजीराव कर्डिले यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी सर्वपक्षीय शोकसभेचे आयोजन सहकार सभागृह येथे करण्यात आले होते. यावेळी सभापती प्रा. राम शिंदे बोलत होते. शोकसभेला पद्मश्री पोपटराव पवार, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष माधवराव कानवडे, माजी मंत्री बबनराव पाचपुते, माजी आमदार भानुदास मुरकुटे, माजी खासदार सदाशिव लोखंडे, आमदार संग्राम जगताप, आ. विठ्ठलराव लंघे, आ. विक्रम पाचपुते, आ. काशिनाथ दाते, आ. अशुतोष काळे, आ. अमोल खताळ, माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील, माजी सभापती भानुदास कोतकर, माजी कुलगुरु सर्जेराव निमसे, माजी महापौर संदीप कोतकर, अक्षय कर्डिले, रोहिदास कर्डिले, जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते, जिल्हाध्यक्ष अनिल शिंदे, जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग, तालुकाध्यक्ष दीपक कार्ले, नगरसेवक निखील वारे, मनोज कोतकर, बाजीराव गवारे, शहर प्रमुख सचिन जाधव, दादाभाऊ चितळकर यांच्यासह सर्वपक्षीय पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी सभापती प्रा. राम शिंदे म्हणाले, शिवाजीराव कर्डिले यांनी तब्बल ३० वर्ष जनतेची सेवा केली. शेवटच्या श्वासापर्यंतही त्यांची सर्वसामान्यांशी नाळ जोडलेली होती. त्यांचे शिक्षण कमी होते परंतु सर्व क्षेत्रात सर्वात त्यांना माहिती होती. प्रस्तापितांची, कारखानदारांची असलेली जिल्हा बँक शिवाजीराव कर्डिले यांनी सर्वसामान्यांची, शेतकर्यांची, दूधवाल्यांची केली. जिवाची पर्वा न करता सर्वसामान्यांसाठी ते अहोरात्र झटत राहिले. आता त्यांची सर्व जबाबदार अक्षय कर्डिले यांच्यावर आली आहे. अक्षय यांनीही कर्डिले साहेबांची सर्व जबाबदार मनाची खूनगाठ बांधून स्विकारावी. आम्ही सर्व जण त्यांच्या सोबत, त्यांच्या पाठिशी आहोत असे त्यांनी सांगितले. यावेळी स्व. आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या आठवणींना पद्मश्री पोपटराव पवार, माजी खासदार सदाशिव लोखंडे, आमदार मोनिकाताई राजळे, आ. विठ्ठलराव लंघे, आ. अमोल खताळ, आ. विक्रम पाचपुते, आ. अशुतोष काळे यांच्यासह अनेकांनी उजाळा दिला. सुत्रसंचालन प्रसाद बेडेकर यांनी केले. शेवटी आभार माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी मानले.
दोन दिवस कार्यकर्ता व संघटनात्मक बैठकीचे आयोजन
आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या अकाली निधनाने राहुरी-नगर-पाथर्डी विधानसभा मतदारसंघातील आणि नगर तालुक्यातील कार्यकर्ते सैरभैर झाले आहेत. पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या डोक्यावरील छत्र हरपले असल्याची भावना शोकसभेमध्ये अनेकांनी व्यक्त केली. पदाधिकारी, कार्यकर्त्यांना आधार देण्यासाठी ५ नोव्हेंबर रोजी पांडुरंग लॉन राहुरी येथे, सहा नोव्हेंबरला जय बजरंग मंगल कार्यालय पाथर्डी येथे सकाळी तर सहा नोव्हेंबरला दुपारी तीन वाजता बाणेश्वर मंगल कार्यालय येथे संघनात्मक बैठकीचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी सांगितले.



