जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे मागणी | नागरिकांत भिती
अहिल्यानगर | नगर सह्याद्री:-
शहरात सोमवारी रात्री चोरट्यांनी एकामागोमाग अनेक दुकाने फोडून धाडसी चोरी केली. चोरट्यांनी पोलिस प्रशासनालाच थेट आव्हान दिले आहे. त्यामुळे पोलिसांनी हे आव्हान स्वीकारून चोरट्यांचा बंदोबस्त करावा, अशी ठाम मागणी आमदार संग्राम जगताप यांनी जिल्हाधिकारी व जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
या चोऱ्यांमुळे व्यापारी व सामान्य नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. जून महिन्यात 16 तारखेला स्कॉर्पिओ, इनोव्हा आणि थार अशा तीन महागड्या गाड्या चोरीला गेल्या होत्या. मात्र अजूनही या चोऱ्यांचा तपास लागलेला नाही. स्टेट बँक चौक परिसरातदेखील चार दुकाने फोडण्यात आली.
रात्री उशिरापर्यंत काही बिनकामाचे लोक शहरात फिरत असतात, त्यामुळे त्यांच्यावर पायबंध घालावा, अशीही मागणी यावेळी करण्यात आली. रात्री 11 नंतर देखील शहर भरलेले असते, बसस्थानकावर मोठी गद दिसते. शहरात सतत सुरू असलेल्या चोऱ्यांमुळे पोलिसांनी योग्य तपास करून दरोडेखोरांवर वचक बसवावा. अन्यथा या सत्राला आळा न घातल्यास लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर, माजी नगरसेवक बाळासाहेब पवार, विपुल शेटिया, अभिजीत खोसे, सुरेश बनसोडे, सुनील त्रिंबके, दीपक खेडकर, सुमित कुलकण, भाऊ बारस्कर, नितीन घोडके, संतोष बोरा, राजेंद्र बोथरा, संजय लोढा, गोपाळ मणियार, विश्वनाथ कासट, अशोक भंडारी, पिंटू खंडेलवाल, भैय्या भांडेकर, प्रतीक बोगावत, दीपक लवलानी आदींसह व्यापारी वर्ग उपस्थित होता.
शहरात वाढलेल्या चोऱ्यांच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलिस अधीक्षकांनी चोऱ्यांचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे (एलसीबी) सोपवण्यात येणार आहे. लवकरात लवकर तपास पूर्ण करून मुद्देमालासह आरोपींना अटक केली जाईल, अशी ग्वाही दिली. तसेच, आडते बाजार परिसरातील व्यापाऱ्यांवर होणाऱ्या दंडात्मक कारवाईसंदर्भात पर्यायांवर लवकरच बैठक आयोजित करून त्यांना योग्य न्याय दिला जाईल, असे आश्वासनही शिष्टमंडळास दिले.
व्यापाऱ्यांवरील कारवाई थांबवावी: आ. जगताप
आडते बाजार ही शहरातील प्रमुख आणि गदची व्यापारी बाजारपेठ आहे. याठिकाणी जिल्हाभरातील व्यापारी मालखरेदीसाठी नियमितपणे येत असतात. मात्र, या भागात मालवाहतूक करणाऱ्या गाड्यांवर पोलीस प्रशासनाकडून वारंवार दंडात्मक कारवाई केली जात असल्यामुळे बाहेरगावचे व्यापारी त्रस्त झाले आहेत. परिणामी, अनेक व्यापारी पुन्हा या बाजारपेठेत येण्यास टाळाटाळ करत आहेत. ज्याचा थेट फटका स्थानिक व्यापारावर बसतो आहे. ही कारवाई तात्काळ थांबवावी आणि व्यापारास पोषक वातावरण तयार करावे, अशी ठाम मागणी आमदार संग्राम जगताप यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.