spot_img
अहमदनगरगरब्यातील ‌‘त्या‌’ फतव्याचा डाव दरी वाढवणारा! दुर्गामाता, खुज्या विचारांना मुठमाती देणार का?

गरब्यातील ‌‘त्या‌’ फतव्याचा डाव दरी वाढवणारा! दुर्गामाता, खुज्या विचारांना मुठमाती देणार का?

spot_img

सामाजिक समजुतदारपणाची लक्तरं वेशीवर टांगली जाणं ही धोक्याचीच घंटा!
सारिपाट / शिवाजी शिर्के
सत्तेसाठीच्या साठमारीमुळे भोवताल बेचव होत आहे की केला जात आहे याचे आत्मचिंतन होण्याची गरज आहे. गरब्यात कोणी नाचावे हे ठरवले जात असेल तर असे ठरवणाऱ्यांना समाजाने उत्तर देण्याची गरज आहे. दोन- चार जण चुकले असतीलही! मात्र, त्याची शिक्षा संपूर्ण समाजाला देण्यात काय अर्थ आहे. राजकारण हा तत्व मूल्य सुसंस्कृतता, विधीनिषेध, माणुसकी या साऱ्याला सोडचिठ्ठी देऊन केला जाणारा व्यवसाय झाला आहे. मतांसाठी समाजकलुशीत करण्याचे, धर्मामधली दरी वाढवण्याचे प्रयत्न आजच सुरू झाले असे नाही. तेव्हा शाह बानो होती, मग बिलकिस बानो आणि आज बानू मुश्ताक आहेत. लाटा आल्या आणि गेल्या, त्यामुळे समाज विस्कटला असेलही पण विखुरलेला नक्कीच नाही. विखुरणारही नाही. कारण नेत्यांनी शहाणपण गमावलं तरी जनता ते शहाणपण सोडणार नाही. दुर्गामातेच्या या उत्सवात खुज्या विचारांना मुठमाती देऊन अखंड हिंदुस्थानातील साऱ्यांनीच एकोप्याने धार्मिक सलोखा जपण्याची गरज आहे.

नगर शहरातील मुस्लिम बहुलवस्ती असणाऱ्या मुकुंदनगरमधून हिंदू समाजाचे पलायन होत असल्याच्या सोशल मिडियातील पोस्टवर वस्तुस्थिती नक्की काय आहे हे स्पष्ट करणारी शाकीर शेख या मित्राची पोस्ट वाचण्यात आली. त्याचवेळी दुसरी पोस्ट साहेबान जहागीरदार या दुसऱ्या मित्राची ‌‘नवरात्रीच्या निमित्ताने होणाऱ्या गरब्यात मुस्लिमांना बंदी व त्यावर त्यांनी व्यक्त केलेला संताप वाचण्यात आला. खरे तर नगरची वाटचाल नक्की कोणत्या दिशेने चालू आहे आणि ती किंती चिंताजनक आहे हे यातून अधोरेखीत होते. खरेतर मुकुंदनगर हा भाग किंवा ही वस्ती मुस्लिमबहुल आहे. मुकुंद हे नाव मुस्लिम नसून हिंदू आहे हे समजून घेण्याची गरज आहे.

त्याच ठिकाणी दर्गादायरा असून तिथे शहा शरीफ बाबांचा दर्गा असून छत्रपती मालोजीराजे यांनी नवस केल्याने त्यांना शहाजीराजे आणि शरीफजी राजे असे दोन अपत्य जन्माला आल्याचे इतिहास सांगतो. राजकीय समिकरणे बदलण्याच्या आधी याच मुकुंदनगरमध्ये कोट्यवधींची विकास कामे झाली. मात्र, गेल्या दीड- दोन वर्षांंपासून या कामांना ब्रेक दिला गेलाय आणि या भागाकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोपही होतोय. लोकसभा निवडणुकीत येथील मतदार नीलेश लंके यांच्या पाठीशी उभा राहिला. लंके खासदार झाल्यानंतर त्यांनी हा भाग वाऱ्यावर सोडल्याची भावना येथील नागरिकांमध्ये आहे. तसेच काहीसे अभिषेक कळमकर यांच्याही बाबतीत झाले आहे. लोकशाहीत प्रत्येकाला मतदानाचा हक्क आहे आणि तो त्याने बजावला पाहीजे. निवडणुकीच्या निकालानंतर आकस न धरता कामे होणे अपेक्षीत आहे. प्रत्यक्षात तसे होताना दिसत नाही हेही वास्तव आहे.

विश्व हिंदू परिषदेच्या महाराष्ट्र विभागाने दि. 20 सप्टेंबरला सर्व मोठ्या गरबा मंडळांसाठी एक सूचनापत्र काढलं. त्यात म्हटलं होतं की गरब्यात हिंदूंव्यतिरिक्त अन्य धमयांना सहभागी होऊ देऊ नये. मंडपात प्रवेश देतानाच आधार कार्ड तपासण्यात यावं. सहभागींना कपाळावर टिळा लावावा लागेल, हातात गंडा बांधावा लागेल. देवीची पूजाही करावी लागेल. विदर्भ महासचिव प्रशांत तितरे यांनी लोकांवर गोमूत्र शिंपडलं जाईल आणि बजरंगदल व विश्व हिंदू परिषदेचे परिषदेचे राष्ट्रीय प्रवक्ता राज नायर यांनी पीटीआयला सांगितलं की, गरबा काही केवळ नृत्य नाही. देवीला प्रसन्न करण्याची एक पद्धत आहे, त्यामुळे ज्यांची या अनुष्ठानांवर श्रद्धा आहे.

त्यांनाच यात सहभागी करून घेणं योग्य ठरेल. लव्ह जिहाद होऊ नये म्हणून एवढी खबरदारी घ्यावीच लागेल. अन्य धर्मियांवर लादलेली ही गरबाबंदी केवळ महाराष्ट्रपुरतीच मर्यादित राहिलेली नाही. मध्य प्रदेशात भोजपाल गरबा उत्सव समितीनेही गैरहिंदूंना प्रवेश देणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. मंडपाच्या प्रवेशद्वारावर वराहाची प्रतिमा लावणण्यात येईल. वराहाचा आशीर्वाद घेऊन, टिळा- गंडेदोरे बांधून घेतल्यानंतरच सनातनींना मंडपात प्रवेश दिला जाईल, असं या मंडळाने जाहीर केलं आहे. रतलाममध्ये गंगाजल शिंपडण्यात येईल, धोती कुर्ता घालून आरती करावी लागेल, असे स्पष्ट फलकच लावले आहेत.

खरेतर, हल्ली असं काही ना काही रोजच घडत असतं. नवनव्या मिशिदींत देवळं शोधण्याचा अट्टहास असो, एखाद्या खासदाराला भर संसदेत अन्य खासदाराने धर्मवाचक अलाघ्य शिविगाळ करणं असो, दर सणावाराला एवढंच नव्हे, तर स्वातंत्र्यदिनालाही मांसविक्रीवर बंदी घालण्याची मागणी होणं, कावड यात्रेवेळी फेरीवाले आणि दुकानदारांनी मालकाच्या नावाची पाटी लावावी, असा फतवा काढला जाणं, बीफ आहे की बफ याची खातरजमा न करता झुंडबळी घेणं, ‌‘मंगलसूत्र चुरा लेंगे और उनको देंगे जिनके ज्यादा बच्चे होते है‌’ म्हणून घाबरवणं, वक्फवर मुस्लिमेतरांची वण लावण्याचा आता न्यायालयाच्या आदेशामुळे फसलेला प्रयत्न, बुलडोझरचा न्याय, ‌‘बटेंगे तो कटेंगे‌’ किंवा ‌‘कपडे देख कर ही पहचान लेंगे‌’ सारखी वक्तव्य पाहता दिवसागणिक आपल्या सामाजिक समजुतदारपणाची लक्तरंच वेशीवर टांगली जात आहेत.

केदारनाथ, ऋषिकेश, अजमेर शरिफ, हजरत निजामुद्दीन, हाजी अली, माहीमसारखे दर्गाह, माउंट मेरीचं चर्च, सुवर्णमंदिरासह देशभरातले विविध गुरुद्वारा, बोधगया, लडाखमधल्या मॉनेस्ट्री, शिर्डीचे साईबाबा अशा विविध ठिकाणी समजुतदारपणा ठसठशीत दिसत असे, आजही दिसतो. आपण मूळचेच असे आहोत का या प्रश्नाच्या खोलात जाण्याची गरज आहे. वेदांतातल्या अद्वैताशी साम्य दर्शवणारं सुफी तत्त्वज्ञान आपल्याला भावलं, शीख धमयांच्या एकमेकांना सांभाळून घेत पुढे जाण्याच्या, उच्च-नीच भेद न करता बंधुत्वभाव जपण्याच्या वृत्तीचं आपल्याला कौतुक वाटत आलं. आपण बोधगयेत बुद्धापुढे नतमस्तक होत आलो. लडाखच्या निर्मनुष्य पहाडांवरचे धीरोदात्त विहार पाहून स्तिमित झालो. गालिब, फैजपासून राहत इंदूरी, निदा फाजली, गुलजारांपर्यंत, नूर जहाँ, बेगम अख्तर यांच्यापासून रफी, गुलाम अलींपर्यंत अनेकांच्या शब्द-सुरांचे चाहते झालो. ख्रिसमसचा प्लम केक, गुरुद्वारातला पिन्नी प्रशाद, नवरोजच्या सल्ली बोटी- पात्रानी मच्छीपासून इफ्तारीच्या बिर्यानी फिरनीपर्यंत साऱ्याची चव आपल्या मनात नेहमीच रेंगाळत राहिली.

सत्तेसाठीच्या साठमारीमुळे भोवताल बेचव होत असताना आपण मात्र हे शब्द, सूर, गंध, जायके लक्षात ठेवणं गरजेचं आहे. प्रत्येकाला चौकटीत बसवण्याचा आक्रस्ताळा अट्टहास सुरू असताना त्या चौकटीतून बाहेर पडण्यासाठी किमान धडपडणं तरी महत्त्वाचं आहे. राजकारण हा तत्व मूल्य सुसंस्कृतता, विधीनिषेध, माणुसकी या साऱ्याला सोडचिठ्ठी देऊन केला जाणारा व्यवसाय झाला आहे. मतांसाठी समाजकलुशीत करण्याचे, धर्मामधली दरी वाढवण्याचे प्रयत्न आजच सुरू झाले असे नाही. तेव्हा शाह बानो होती, मग बिलकिस बानो आणि आज बानू मुश्ताक आहेत. लाटा आल्या आणि गेल्या, त्यामुळे समाज विस्कटला असेलही पण विखुरलेला नक्कीच नाही विखुरणारही नाही. कारण नेत्यांनी शहाणपण गमावलं तरी जनता ते शहाणपण सोडणार नाही. म्हणूनच नवरात्री उत्सवाच्या निमित्ताने समाज एकसंघ कसा राहील याचे भान जपण्याची गरज आहे. राजकारण्यांना त्यांची पोळी भाजून घ्यायची असेल तर हा डाव समाजातील विविध जाती- धर्मांनी ओळखून सामाजिक सलोखा वाढीस लावण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

जनतेच्या पैशाने सार्वजनिक ठिकाणी नेत्यांचे पुतळे उभारण्यास बंदी; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश

नवी दिल्ली / वृत्तसंस्था - जनतेच्या पैशांतून सार्वजनिक ठिकाणी नेत्यांचे पुतळे उभारण्यास बंदी घालण्याचा...

राज्य सरकारचा मोठा निर्णय, पीक नुकसानासाठी मदत जाहीर; मंत्र्यांनाही दिल्या तातडीच्या सूचना

मुंबई / नगर सह्याद्री - राज्यातील अनेक भागात ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने जनजीवन विस्कळीत...

पारनेरच्या तहसीलदार शेतकऱ्यांच्या बांधावर; दिले महत्वाचे आदेश

पावसामुळे शेती पिकांचे नुकसान; तातडीने पंचनामे करण्याचे आदेश पारनेर / नगर सह्याद्री - गेल्या काही...

सुपा परिसरात अतिवृष्टी: ‘तो’ रस्ता दहा तास बंद, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान, वाचा सविस्तर

सुपा | नगर सह्याद्री पारनेर तालुक्यातील सुपा परिसरातील सुपा, वाळवणे, रायतळे, अस्तगाव, पिंपरी गवळी, रांजणगाव...