अहिल्यानगर | नगर सह्याद्री
केडगाव उपनगरातील विस्कळीत पाणी पुरवठ्यामुळे नागरिकांचे प्रचंड हात होत आहेत. त्यामुळे केडगावचा पाणी पुरवठा सुरळित करण्यात यावा अशी मागणी माजी सभापती मनोज कोतकर यांनी महापालिकेचे जल अभियंता परिमल निकम यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
शहरातील सर्वात मोठ्या आणि दाट लोकवस्ती असलेल्या केडगाव उपनगरातील पाणीपुरवठा गेल्या काही महिन्यांपासून पूर्णतः विस्कळीत झाला आहे. सुमारे 1 लाख लोकसंख्या असलेल्या या भागात आठवड्यातून केवळ एकदाच पाणीपुरवठा होत असून, तोही अत्यल्प दाबाने होत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
महिलांमध्ये विशेषतः असंतोषाचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर अहिल्यानगर महानगरपालिकेचे स्थायी समितीचे माजी सभापती मनोज कोतकर यांनी जल अभियंता परिमल निकम यांच्याशी चर्चा करत निवेद सादर करत पाणी पुरवठा वेळेवर व पूर्ण दाबाने सुरळीत करावी अशी मागणी केली.
पाणी ही नागरिकांची जीवनावश्यक गरज आहे. नागरिकांना टँकरचा खर्च परवडत नाही आणि घरांमध्ये पाणी नसल्यामुळे सतत तणावाचे वातावरण राहते. महिला वर्गामध्ये महापालिकेच्या विरोधात मोठी संतापाची लाट आहे. पाणीपुरवठा वेळेवर होत नसल्यामुळे नागरिकांना विविध संकटांना सामोरे जावे लागत आहे. तरी केडगाव उपनगराचा विस्कळीत झालेला पाणीपुरवठा सुरळीत करून नागरिकांना 2 दिवसाला पूर्ण दाबाने पाणीपुरवठा करावा.
या निवेदनानंतर आता महापालिकेने लवकरात लवकर ठोस उपाययोजना करून केडगावकरांना दिलासा द्यावा, अशी मागणी अहिल्यानगर महानगरपालिकेचे जल अभियंता परिमल निकम यांच्याकडे केली. असल्याची माहिती महानगरपालिकेचे स्थायी समितीचे माजी सभापती मनोज कोतकर यांनी दिली.
वीज पुरठ्यात वारंवार अडथळा
मुळा धरण पंपिंग स्टेशनला महावितरणच्या वीज पुरवठ्यात वारंवार अडथळा येत आहे. परिणामी, केडगावसह इतर भागांमध्येही पाणीपुरवठा विस्कळीत होत आहे. यासंदर्भात महावितरणकडे सातत्याने पत्रव्यवहार केला असून, नियमित वीजपुरवठा सुरळीत ठेवण्याची मागणी करण्यात आलेली आहे. अशी माहिती जल अभियंता परिमल निकम यांनी दिली.