नगरपरिषद व नगरपंचायतींसाठी राजकारण तापले | वरिष्ठांकडून आदेश मिळेना
अहिल्यानगर | नगर सहयाद्री:-
अहिल्यानगर जिल्ह्यातील 11 नगरपरिषद व एका नगरपंचायतच्या निवडणुकीसाठी राजकारण तापले आहे. मात्र निवडणूक महायुती की महाविकास आघाडीकरुन लढायचे याबाबत अद्यापही वरिष्ठांकडून आदेश आलेला नाही. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये युती, आघाडीचे चित्र सध्या तरी धुसर दिसत असून स्थानिक आघाड्यांनी राजकारणात आघाडी घेतल्याचे दिसून येत आहे. महायुती, महाविकास आघाडीबाबत स्पष्टता नसल्याने निवडणुकीतील सस्पेन्स वाढला आहे.
सोमवार (दि.10) पासून नगर जिल्ह्यातील 12 पालिकांच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरूवात झाली आहे. पुढील आठवड्यात 17 तारखेपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्यास मुदत आहे. यात शनिवार आणि रविवारी सुट्टीचा दिवस असून पहिले दोन दिवसात एकही उमेदवारी अर्ज दाखल झालेला नाही. यामुळे उमेदवारी दाखल करण्याचे तीन दिवस संपले आहेत. सोमवारी अर्ज भरण्यास अखेरचा दिवस आहे. त्यामुळे उमेदवारी दाखल करण्याच्या शेवटच्या टप्प्यात भावी नगरसेवकांची उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मोठी गद होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, नगर जिल्ह्यात पालिका निवडणुकीसाठी अद्याप राजकीय चित्र धुसर दिसत आहे. जिल्ह्यात सत्ताधारी महायुतीमधील भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे आमदार अधिक असतांना पालिका निवडणूकांमध्ये अद्याप महायुती म्हणून निवडणूक लढणार की नाही याबाबत कोणीही बोलायला तयार नाहीत. त्यामुळे इच्छुकही संभ्रमावस्थेत आहेत. दरम्यान, उमेदवारी अर्ज भरण्यास अवघे तीनच दिवस शिल्लक असल्याने स्थानिक आघाड्यांनी आता आघाडी घेतली असून जागा वाटपाच्या वाटाघाटी सुरु आहेत. याबाबत उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी स्पष्टता येणार आहे.
महापालिका, जिल्हा परिषदेचे पक्षप्रवेश लांबणीवर
सध्या नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरु असून सोमवार 17 नोव्हेंबर उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची मुदत आहे. त्यामुळे पालिकांच्या निवडणुकीसाठी हालचाली गतिमान झाल्या असून इच्छुकांचे प्रक्षप्रवेश होत आहेत. स्थानिक कल आणि सोयीचे आरक्षण लक्षात घेऊन पक्षप्रवेशाचा जोर वाढला आहे. दरम्यान जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी अजून काही दिवसांचा अवधी आहे. तर जानेवारी महिन्यामध्ये महापालिकांच्या निवडणुका होणार आहेत. महापालिकेचे प्रभाग निहाय आरक्षण जाहीर आहे. तसेच जिल्हा परिषद व पंचायत समिती गट-गणांचे आरक्षण जाहीर झालेले आहेत. आरक्षणानुसार इच्छुकांनी तयारी सुरु केली आहे. परंतु, या निवडणुकांना अजून अवधी असल्याने पक्षप्रवेश लांबणीवर पडले आहेत.
वार्डातील पॅनेलची जुळवाजुळव
महापालिका निवडणुकीसाठी वॉर्डातील आरक्षण दि. 11 रोजी जाहीर झाले. आरक्षण जाहीर झाल्याने अनेक मातब्बरांना धक्का बसला आहे. त्यामुळे त्यांना सौभाग्यवतींना निवडणूकीच्या रिंगणात उतरावे लागणार आहे. महापालिका निवडणुकीत महायुती की महाविकास आघाडी करुन लढणार हे अद्याप स्पष्ट नाही. असे असले तरी शहरात भाजप- राष्ट्रवादीची (अजित पवार गट) युती होईल असे सांगितले जात आहे. त्या अनुषंगानेच वॉडातील जागांचे नियोजन केले जात आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडी एकत्रितच निवडणुकांना सामोरे जाईल असे काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात व खासदार निलेश लंके यांनी स्पष्ट केले आहे. महाविकास आघाडीकडूनही वॉर्डातील पॅनेलची जुळवाजुळव सुरु आहे.



