10 कोंटींची खंडणी मिळत नसल्याने आवळला गळा | मृतदेह नालीत फेकला
अहिल्यानगर | नगर सह्याद्री
नगर तालुक्यातील विळद गावातील काही लोकांकडून येणे असलेली आपली रक्कम वसूल करण्यासाठी बोल्हेगाव येथील उद्योजक दीपक परदेशी यांनी नेमलेल्या दोघांनी रक्कम वसूूल होणे शक्य नसल्याचे लक्षात येताच ज्यांनी वसुलीचे काम दिले त्याच्याकडून 10 कोटींची खंडणी मागण्याची योजना आखली व यश मिळत नसल्याचे पाहून उद्योजकर परेदशी यांचाच काटा काढल्याचे तपासात आढळून आले आहे.
नगर तालुक्यातील बोल्हेगाव येथील रहिवासी उद्योजक दीपक परदेशी यांचे विळद गावातील काही लोकांकडून पैसे येणे होते. ते वसूल होत नसल्याने त्यांंनी आरोपी किरण बबन कोळपे (वय-38, रा. विळद, ता. नगर, जि. अहिल्यानगर) याच्यावर रक्कम वसूल करण्याचे काम सोपविले. किरण कोळपे याने सागर गीताराम मोरे (वय 28, रा. ब्राह्मणी, ता. राहुरी, जि. अहिल्यानगर) यास आपल्या हॉटेलवर बोलाविले व वसुलीस मदत करण्यास सांगितले, अशी माहिती सागर मोरे याने आपल्या जबाबात पोलिसांनी दिली. धमकी देऊन किंवा एखाद्यास मारहाण करून का होईना माझे पैसे मला वसूल करून द्या, असे दीपक परदेशी यांनी सांगितले होते. त्या दोघांकडून विळद येथील रक्कम वसूल होणार नाही हे लक्षात येताच त्यांनी दीपक परदेशी यांच्याकडून अधिकची रक्कम अर्थात खंडणी घेऊ अशी योजना आखली.
या संदर्भात तोफखाना पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अमोल दत्तू गायधनी यांच्या फिर्यादीवरून मिसिंगचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज पाहून 17 मार्च 2025 रोजी किरण कोळपे व सागर मोरे यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून सखोल माहिती घेतली असता त्यांनीच हा गुन्हा केल्याचे कबूल केले.
असा केला खंडणीचा प्लॅन अन केला खून
महाशिवरात्रीच्या दोन दिवस अगोदर 24 फेब्रुवारी 2025 रोजी किरण कोळपे व सागर मोरे हे दुपारी दोनच्या सुमारास बोल्हेगाव येथे गेले. दीपक परदेशी यांना बोलणी करण्यासाठी म्हणून त्यांना घरातून बाहेर बोलविले. किरण कोळपे याने आपल्या पांढऱ्या रंगाच्या इंडिका कारमध्ये बसविले. सागर मोरे हा अगोदरच कारमध्ये बसलेला होता. हे तिघे बोल्हेगावमधून निंबळकच्या दिशने पुढे नगर-मनमाड हायवेकडे निघाले. किरण कोळपे स्वत: कार चालवीत होता. दीपक परदेशी त्याच्या शेजारी बसले. सागर हा मागच्या सीटवर बसला होता. ठरल्याप्रमाणे परदेशी यांच्याकडे 10 कोटी रुपये खंडणी मागण्यात आली. ती देण्यास परदेशी यांनी असमर्थता दर्शविल्याने किरण कोळपे याने दीपक परदेशीचे दोन्ही हात सीटच्या मागून पकडून ठेवण्यास सागर मोरे यास सांगितले. मोरे याने ते केले. परदेशी हे सुटका करून घेण्यास धडपटत होते, तेव्हा कारमध्ये आधीच ठेवलेल्या नायलॉन दोरीने सागर मोरे याने परदेशी यांचा गळा घट्ट आवळला. परदेशी यांनी तरीही झटपट करीत कारचा दरवाजा उघडला व ते खाली पडले. तेव्हा दोघांनी मिळून पुन्हा त्यांचा गळा नायलॉन दोरीने घट्ट आवळला व त्यांना ठार मारले. त्याच दिवशी म्हणजे 24 फेब्रुवारी रोजी रात्री साडेआठच्या सुमारास दीपक परदेशी यांचा मृतदेह निंबळक बायपास हायवे रोडचे कडेला असलेल्या सिमेंटच्या बंदिस्त नालीमध्ये दोघांनी मिळून उत्तरविला. मृतदेह नालीच्या आत कोणास दिसणार नाही अशा ठिकाणी सागर मोरे याने नेऊन ठेवला व ते दोघेही परत गेले.