spot_img
अहमदनगरनगरच्या जनतेचा आधारवड हरपला : माजी आमदार अरुणकाका जगताप यांचे निधन

नगरच्या जनतेचा आधारवड हरपला : माजी आमदार अरुणकाका जगताप यांचे निधन

spot_img

विधान परिषदेचे माजी आमदार अरुणकाका जगताप यांचे निधन | संग्राम जगताप यांना पितृशोक
अहिल्यानगर | नगर सह्याद्री:-
माजी नगराध्यक्ष व विधान परिषदेचे माजी आमदार अरुणकाका बलभीमराव जगताप (वय 67) यांचे शुक्रवारी पहाटे निधन झाले. त्यांच्या मेंदूत रक्तस्त्राव झाल्यामुळे त्यांना पाच एप्रिल रोजी पुणे येथील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. तब्बल एक महिना त्यांनी मृत्यूशी झुंज दिली. अखेर शुक्रवारी पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. अहिल्यानगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांचे ते वडील होते.

दिवंगत अरुणकाका जगताप यांनी युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदापासून आपल्या राजकारणाचा श्रीगणेशा केला. नगरपालिकेत ते नगरसेवक झाले. सलग पाच वर्ष ते तत्कालीन अहमदनगर नगरपालिकेचे अध्यक्ष राहिले. दोनवेळा ते विधानपरिषदेवर निवडून गेले. अहमदनगर शहर मतदारसंघातून मात्र ते दोनवेळा पराभूत झाले. महापालिकेत ते पुन्हा नगरसेवक म्हणून निवडून आले. मात्र स्वत:ऐवजी त्यांनी त्यांचे चिरंजीव संग्राम जगताप यांना महापौर केले. जिल्हा बँकेचे संचालक म्हणूनही त्यांनी काम केले. आर्युवेद शास्त्र मंडळाचे अध्यक्ष म्हणून ते अनेक वर्षांपासून काम पाहत आहेत. जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी क्रीडा क्षेत्रात ठसा उमटवला. घोडेस्वारी, नव्या गाड्यांचा छंद. शेती, उद्योग, हॉटेल व्यवसायात त्यांना विशेष रुची होती.

तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या काळात त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. मात्र ते सहा महिनेत तिथे रमले. पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येऊन त्यांनी संघर्ष केला. जिल्हा काँग्रेसचे कार्याध्यक्षपदही त्यांनी सांभाळले होते. त्यांचे चिरंजीव संग्राम जगताप हे सलग तीनवेळा अहिल्यानगर शहर मतदारसंघातून निवडून आले तर दुसरे चिरंजीव सचिन हे जिल्हा परिषदेचे सदस्य होते. आमदार शिवाजीराव कर्डिले आणि भानुदास कोतकर यांचे ते व्याही होते.

* संपूर्ण नाव: अरुण बलभीमराव जगताप
* जन्म दिनांक : 25 मार्च 1959, वय – 66 वर्ष.
* शिक्षण : पाचवी पास
* व्यवसाय : शेती, हॉटेल, घोडे व खिल्लारी गाय तसेच बैलांचा शौक
* सन 1986 ला युवक काँग्रेस चे शहराध्यक्ष
* सन 1989 मध्ये अपक्ष म्हणून विधानसभा लढविली.
* 1991 ते 1996 दरम्यान शहराचे नगराध्यक्ष
* सन 1992 पासून आयुर्वेद शास्त्र सेवा मंडळ, वै. गंगाधर
शास्त्री गुणे आयुर्वेद महाविद्यालय व हॉस्पिटलचे अध्यक्ष
* सन 1999 मध्ये अपक्ष म्हणून विधानसभा लढविली
* सन 2003 पासून जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष,
* सन 2008 पासून महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन सदस्य
* सन 2003 साली तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख
यांच्याकडून महापालिका स्थापनेचा कलश शहरात आणला
* 2005 ला संदीप कोतकर यांना महापौर करण्यात मोठे योगदान
* सन 2006 साली शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश
* सन 2008 पुत्र संग्राम जगताप यांना महापौर केले
* स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाचे सिनेट सदस्य
* सन 2020-2021 दरम्यान कोरोना संकट काळात मदत व
‌‘गुणे आयुर्वेद‌’मध्ये कोविड सेंटर व ऑक्सिजन प्लांट सुरू
* जिल्हा बॉडी बिल्डिंग असोसिएशनचे अध्यक्ष
* राष्ट्रीय स्तरावरील राष्ट्रीय रत्न पुरस्काराने सन्मानित
* राष्ट्रीय स्तरावर हिंदकेसरी कुस्ती स्पर्धेचे यशस्वी आयोजन
* महाराष्ट्र श्री बॉडी बिल्डिंग स्पर्धेचे यशस्वी आयोजन
* 05 एप्रिल 2025 रोजी पुण्यात रुबी हॉस्पिटलमध्ये दाखल
* 02 मे 2025 रोजी पहाटे निधन

सामान्यांशी नाळ जुळलेलं नेतृत्व हरपलं; अजित पवार
माजी आमदार अरुणकाका जगताप यांच्या दुःखद निधनानं राजकारण, समाजकारण, कला, क्रीडा, शिक्षण, सहकार अशा अनेक क्षेत्रात कार्यरत असलेलं, सामान्यांची घट्ट नाळ जुळलेलं कर्तृत्ववान नेतृत्व हरपलं आहे. तत्कालीन अहमदनगर नगरपालिकेचे अध्यक्ष, जिल्हा क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष, आयुर्वेद शास्त्र मंडळाचे अध्यक्ष, प्रयोगशील शेतकरी, वारकरी संप्रदायाचा सच्चा पाईक म्हणून ते कायम अहिल्यानगरवासियांच्या लक्षात राहतील. त्यांचे निधन ही अहिल्यानगर जिल्ह्याची मोठी आणि असून त्यांच्या निधनाचा धक्का पचवण्याची शक्ती त्यांचे पुत्र आमदार संग्राम जगताप, संपूर्ण जगताप कुटुंबीय आणि कार्यकर्त्यांना मिळो, अशी प्रार्थना करतो. आम्ही सर्वजण जगताप कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहोत. दिवंगत अरुणकाकांच्या आत्म्यास सद्गती लाभो, ही प्रार्थना., अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माजी आमदार अरुणकाका जगताप यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त करून श्रद्धांजली वाहिली आहे.

माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी केले दुःख व्यक्त
माजी विधान परिषद सदस्य, माझे सहकारी आ. संग्राम भैय्या जगताप यांचे वडील व आमचे मार्गदर्शक अरुणकाका जगताप यांच्या निधनाचे वृत्त दुःखद आहे. त्यांच्या जाण्याने राजकारण, समाजकारण, क्रीडा, सहकार आदी क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेले एक नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेले आहे. जगताप कुटुंबियांवर कोसळलेल्या या दुःखात मी सहभागी आहे. ईश्वर स्व.अरुण काकांच्या आत्म्यास चिर:शांती प्रदान करो. भावपूर्ण श्रद्धांजली. अशा शब्दात माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी दुःख व्यक्त केलं आहे.

शहरासह जिल्ह्यात शोककळा
विधान परिषदेचे माजी आमदार अरुणकाका जगताप यांची शुक्रवारी पहाटे मृत्यूशी झुंज अपयशी ठरली. त्यांना उपचारार्थ पुणे येथील रुग्णालयात महिन्यापूवच दाखल करण्यात आले आहे. याची माहिती मिळताच अनेकांनी पुण्यातील रुग्णालयाकडे अनेकांनी धाव घेतली होती. उपचारासाठी व्यत्यय येवू नये म्हणून राष्ट्रवादीच शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर व माजी उपमहापौर गणेश भोसले यांनी काकांवर प्रेम करणाऱ्यांनी नगरमध्येच राहून प्रार्थना करावी पुण्याकडे येवू नये असे आवाहन केले होते. परंतु, शुक्रवारी पहाटे अरुण काकांची प्राणज्योत मालवल्याची बातमी समजताच अहिल्यानगर शहरासह जिल्ह्यात शोककळा पसरली. अनेकांनी हळहळ व्यक्त केली.

एक आनंदयात्री अनंताच्या प्रवासाला निघून गेले
माजी आमदार अरुणकाका जगताप यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. हिवरे बाजार परिवारातील एक सदस्य आणि हिवरे बाजारच्या कुस्तीवर नितांत प्रेम करणारे होते. त्यांच्या अचानक जाण्यामुळे हिवरे बाजार परिवाराला अतीव दुःख झाले असून एक आनंदयात्री अनंताच्या प्रवासाला निघून गेल्याची प्रतिक्रिया पद्मश्री पोपटराव पवार यांनी दिली. आम्ही हिवरे बाजार परिवार जगताप कुटुंबीयांच्या द:ुखात सहभागी असून त्यांना हिवरे बाजार परिवाराच्या वतीने अखेरची भावपूर्ण आदरांजली.

मितभाषी नेतृत्व हरपलं: अंकुश काकडे
अहिल्यानगरचे नेते अरुणकाका जगताप यांच्या निधनामुळे अहिल्यानगरचं एक मितभाषी नेतृत्व हरपलं. गेली 30-40 वर्षे अहमदनगर शहराचं नेतृत्व काकांनी समर्थपणे सांभाळले. त्यानंतर त्यांचा वारसा चिरंजीव संग्राम यांनी देखील महानगरपालिका असेल विधानसभा असेल अशा ठिकाणी आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला. माझा आणि काकांचा जवळपास 20-25 वर्षांपासून संबंध आला. एक अतिशय शांत, सर्वांना बरोबर घेऊन जाणारा नेता म्हणून त्यांची प्रतिमा माझ्या मनात कायम राहील. परमेश्वर काकांना सद्गति देवो ही प्रार्थना.

कापडबाजारातील व्यापाऱ्यांनी वाहिली श्रद्धांजली
नगर शहरातील प्रतिष्ठित व्यापारी नेते आणि सामाजिक कार्यकर्ते कै. अरुणकाका बालभीमराव जगताप यांच्या निधनाने संपूर्ण व्यापारी समाजात शोककळा पसरली आहे. त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ सकाळी 10:30 वाजता वंदे मातरम चौकात सर्व व्यापारी बांधवांनी तसेच मित्र परिवार व सर्व आस्थापनांचे कर्मचारी यांनी एकत्र येऊन, अहिल्यानगर व्यापारी महासंघ, वंदे मातरम युवा प्रतिष्ठान आणि कापडबाजार श्री गणेश मित्र मंडळ यांच्या वतीने त्यांना सामूहिक श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी अहिल्यानगर व्यापारी महासंघाचे अध्यक्ष ईश्वर बोरा, वंदे मातरम युवा प्रतिष्ठानचे निवर्तमान अध्यक्ष प्रतीक बोगावत, बजरंग दलाचे कुणाल भांडारी, चिंटू खंडेलवाल, भैय्या भांडेकर, केतन मुथा, संदीप बायड, संभव काठेड, संतोष ठाकूर, सोनू गायकवाड, प्रकाश बायड, निलेश गुंदेचा, देवेंद्र भाटेजा, देवेंद्र दूधाळे, आदित्य गांधी, प्रदीप गोपलानी, अण्णा येणगंदुल, मनीष सोनग्रा, प्रतीक गोयल, तेजस डहाळे, ललित कटारिया, जवाहर गांधी, प्रणित नारंग, रवी गांधी, विक्रम नारंग, प्रणील बोगावात, किशोर तलरेजा, दीपक नवलानी दीपक तलरेजा आदींसह व्यापारी, कर्मकचारी, स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बाजार पेठ बंद ठेवून व्यापाऱ्यांनी वाहिली श्रद्धांजली
गेल्या काही दिवसांपासून पुणे येथील एका रुग्णालयात माजी आमदार अरुणकाका जगताप यांच्यावर उपचार सुरु होते. उपचार सुरु असतांना शुक्रवारी पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली. याची वार्ता नगरकरांना व कार्यकर्त्यांना समजताच अनेकांनी हळहळ व्यक्त केली. अहिल्यानगर शहरातील व्यापारी बांधवांनी बाजारपेठा बंद ठेवून अरुणकाकांना श्रद्धाजली वाहिली. शहरातील अनेकांनी आपली दुकाने बंद ठेवली होती.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

दिलदार काका

नगर सहयाद्री । विशेष संपादकीय नाव अरुण बलभीमराव जगताप; परंतु परिचित अरुणकाका या ‌‘फेव्हरेट‌’ नावाने....

भक्तांसाठी खुशखबर! केदारनाथ धामचे दरवाजे भक्तांसाठी खुले

Kedarnath Dham: चारधामांपैकी एक प्रसिद्ध असलेले केदारनाथ मंदिराचे शुक्रवारी सकाळी 7 वाजता भाविकांसाठी खुले...

बिरोबा यात्रेच्या कावडीधारकांना चारचाकीची धडक; एक ठार, कुठे घडली घटना?

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- बिरोबा यात्रेनिमित्त यात्रेनिमित्त कावडी घेऊन येणाऱ्या तरुणाच्या अंगावर चार चाकी वाहनाने...

सुप्या प्रमाणे नगर एमआयडीसीही साफ करणार; पालकमंत्री विखे पाटील

महाराष्ट्र व कामगार दिनानिमित्त कामगार मेळावा; आदर्श कामगारांचा सत्कार सोहळा अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- नगरच्या...