अहिल्यानगर | नगर सह्याद्री:-
लग्नाचे वऱ्हाड घेऊन जाणाऱ्या खासगी स्कूल बसचा दरवाजा उघडा राहिल्याने बसमधून पडून एकाचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी सकाळी सव्वाअकरा वाजण्याच्या सुमारास जेऊर टोल नाक्याजवळ घडली. राजेंद्र तात्याबा गवांदे (वय 45, रा. शेंडी, ता. अहिल्यानगर) असे मयताचे नाव आहे.
या प्रकरणी मयताचे सासरे माणिक त्रिंबक घोडेचोर (रा. तेलकुडगाव, ता. नेवासा) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चालक कानिफनाथ प्रभाकर वारे (रा.शिराढोण, ता. अहिल्यानगर) याच्या विरोधात एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बुधवारी सकाळी अहिल्यानगर ते छत्रपती संभाजी नगर रस्त्यावरून स्कूल बसमधून (एमएच 43 एच 4083) लग्नाचे वऱ्हाड घेऊन जात असताना जेऊर टोल नाक्याजवळ बनकर वस्तीजवळ बसचा दरवाजा उघडा राहिल्याने राजेंद्र तात्याबा गवांदे खाली पडले.
बसमधील लोकांनी आरडाओरडा केल्यावर चालक बस रस्त्याच्या कडेला घेत असताना राजेंद्र हे बसच्या पाठीमागील टायरखाली सापडले व त्यांचा मृत्यू झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. अधिक तपास पोसई मोंढे करत आहेत.