नवी दिल्ली | वृत्तसंस्था
वक्फच्या सुधारणा विधेयकावरुन लोकसभेत विरोधी पक्षांनी तुफान राडा केला. ज्यामुळे लोकसभेचे कामकाज हे सुरुवातीला 15 मिनिटांसाठी स्थगित करण्यात आलं तर त्यानंतर दुपारी 2 वाजेपर्यंत हे कामकाज स्थगित करण्यात आले. राज्यसभेत जेव्हा या विधेयकावरचा अहवाल सादर करण्यात आला तेव्हा विरोधी पक्षांनी जोरदार घोषणाबाजी केली. संसदीय समितीचा जो अहवाल आहे तो अहवाल सादर होताच विरोधकांनी गदारोळ करण्यास आणि गोंधळ घालण्यास सुरुवात केली.
लोकसभेत जेव्हा कामकाज तहकूब करण्यात आलं त्यानंतर प्रियांका गांधी, राहुल गांधी यांच्यासह काँग्रेस खासदारांनी जोरदार आंदोलन केले. वक्फ सुधारणा विधेयक आणून भाजपाला तिरस्कार पसरवायचा आहे असा आरोप विरोधी पक्षातील खासदारांनी केला आहे.राज्यसभेत जेव्हा वक्फ सुधारणा विधेयकावर संसदीय समितीचा अहवाल सादर झाला तेव्हाही गदारोळ झाला. काँग्रेस खासदार गौरव गोगोई यांनी हा आरोप केला आहे की या सुधारणा विधेयकात अनेक कमतरता आणि त्रुटी आहेत. सरकारने त्यावर गांभीर्याने विचार केला पाहिजे.
लोकसभा आणि राज्यसभेत गदारोळ
राज्यसभेत वक्फवरुन प्रचंड गदारोळ झाल्यानंतही या संदर्भातला अहवाल भाजपा खासदार मेधा कुलकण यांनी मांडला. या दरम्यान विरोधी पक्षांनी घोषणाबाजी करत गदारोळ केला. सभापती जगदीप धनकड यांनी गदारोळानंतर राज्यसभेचं कामकाज 15 मिनिटांसाठी स्थगित केलं होतं. राज्यसभेत जसा राडा झाला तसाच तो लोकसभेतही झाला. ज्यानंतर हे विधेयक मागे घेण्याचीही मागणी करण्यात आली. लोकसभेत विरोधकांचा गदारोळ इतका वाढला की लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी कामकाज दुपारी 2 पर्यंत स्थगित केले.