लाडकी बभीण योजनेबरोबरच दुधाचे अनुदान चालूच राहणार; शिवाजी कर्डिले
अहिल्यानगर । नगर सहयाद्री:-
राज्यातील महायुती सरकारने दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी दूधाला प्रतिलिटर 7 रुपये अनुदान देण्याचे काम केले आहे. लाडकी बहिण योजना सुरु करून महिलांच्या खात्यात दरमहा 1500 रुपये जमा केले आहेत. शेतकऱ्यांना वीज बिल माफी दिली आहे. असे अनेक जनहिताचे निर्णय घेतल्याने महायुतीवरील लोकांचा विश्वास वाढला आहे. दुर्देवाने विरोधी महाविकास आघाडीकडे मुद्दे नसल्याने ते महायुतीच्या योजनांना आडकाठी आणत आहेत. दूधाचे अनुदान बंद होईल अशा अफवा पसरविण्यात येत आहे. परंतु तसे काहीही होणार नसून महायुती सरकार पुन्हा सत्तेत आल्यानंतर हे अनुदान कायमच राहणार आहे. त्यासाठी मी स्वत: पाठपुरावा करेल, अशी ग्वाही माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी दिली.
राहुरी विधानसभा मतदारसंघाचे भाजप महायुतीचे उमेदवार माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी विरोधकांकडून होणाऱ्या विविध आरोपांना तसेच टिकेला जोरदार प्रत्युत्तर देत राज्यात महायुतीचे सरकार पुन्हा येणार असा विश्वास व्यक्त केला आहे. कर्डिले म्हणाले, मी स्वत: शेतकरी आहे. 25 वर्षे दुधाचा व्यवसाय केला आहे. त्यामुळे दूध उत्पादकांच्या व्यथांची मला जाणीव आहे. दूध उत्पादकांना दिलासा देणारे निर्णय होण्यासाठी मी कायम प्रयत्न केले आहेत. सन 2014 ला मी आमदार असताना तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सातत्याने दूध उत्पादकांचे प्रश्न मांडून त्याची सोडवणूक करण्यासाठी प्रयत्न केलेत.
राज्यात 2019 ला महाविकास आघाडीचे सरकार आल्यावर त्यांच्या काळात दुधाला अतिशय कमी दर मिळत होता. तेव्हा त्यांना दूधाला अनुदान देण्याची इच्छाशक्ती दाखवता आली नाही. लाडकी बहिण योजनेमुळे महायुतीवर महिला भगिनींचा विश्वास वाढला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीने आता त्यांच्या जाहीरनाम्यात लाडक्या बहिणींना 3 हजार रुपये देण्याचे आश्वासन दिले आहे. वास्तविक त्यांना त्यांच्या अडीच वर्षाच्या सत्ताकाळात लाडक्या बहिणी आठवल्या नाहीत. आता त्यांचे सरकार येणार नाही हे त्यांना माहिती आहे. म्हणून खोटी आश्वासने दिली जात आहेत. त्यावर जनता अजिबात विश्वास ठेवणार नाही. उलट महायुती सरकार पुन्हा येताच लाडक्या बहिणींना आणखी जादा पैसे देण्याचे आश्वासन मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी दिले आहे.
महायुती सरकारच्या लोककल्याणकारी योजनांमुळे सामान्य जनता आनंदीत आहे. यंदाच्या निवडणुकीत मला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. दररोज शेकडो युवक, नागरिक भाजपमध्ये प्रवेश करीत आहेत. त्यांना विश्वास आहे की राज्यात पुन्हा भाजप महायुतीचे सरकार आल्यावर हे सरकार आणखी चांगल्या योजना राबवून सर्वसामान्य जनतेला दिलासा देण्याचे काम करेल. महायुती सरकार येताच शेतकऱ्यांना दूधाला 35 रुपये दर आणि 7 रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला. महाविकास आघाडीने निवडणूक आयोगाला पत्र देवून सदर अनुदान निवडणुक काळात न देण्याची मागणी केली. आता आचारसंहिता संपताच उरलेले सर्व अनुदान देण्यात येईल.
या निवडणुकीत मला अभूतपूर्व प्रतिसाद मिळत आहे. महायुती सरकारच्या कामांमुळे जनता आनंदीत आहे. मुलांचे शिक्षण, महिलांसाठीच्या योजना, शेतकऱ्यांना मोफत वीज अशा निर्णयांमुळे दररोज शेकडो युवक, नागरिक माझ्या माध्यमातून भाजपत प्रवेश करीत आहे. मी स्वत: सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातून राजकारणात आलो. मला कुठलाही राजकीय वारसा नाही. माझे वडील, आजोबा कोणी साधे ग्रामपंचायतीचे सदस्यही नव्हते. तरीही केवळ लोकांच्या विश्वासामुळे मी 25 वर्षे आमदार राहिलो, मंत्रीपदही मिळाले. आताही पुन्हा आमदार झाल्यावर संपूर्ण मतदारसंघात भरीव विकासकामे करून मतदारसंघाचा चेहरामोहरा बदलेले अशी ग्वाही कर्डिले यांनी दिली.
तनपुरेंचा खरा चेहरा जनतेसमोर आला
तनपुरे परिवाराने या निवडणुकीत राजकीय पातळी सोडली आहे. माजी खा.प्रसाद तनपुरे यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना धमकावण्याचे काम केले. अनेक ठिकाणी भाजप कार्यकर्त्यांना प्रचार पत्रक वाटण्यास मज्जाव केला जातो. स्वत:ला सुसंस्कृत म्हणवणाऱ्यांचा खरा चेहरा समोर आला आहे. आमच्यावर गुंडगिरीचे आरोप करणारे स्वत:च किती गुंडगिरी करतात, दहशत निर्माण करतात हे जनतेला आता चांगलेच कळून चुकले आहे, असेही कर्डिले यांनी नमूद केले.