मुंबई। नगर सहयाद्री:-
गेल्या काही दिवसांपासून राज्यातील अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस कोसळत आहे. आज हवामान विभागाने मुंबईसह कोकणात, पश्चिम महाराष्ट्र तसेच विदर्भामध्ये मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. नागरिकांनी काळजी घेण्याचे, तसेच अनावश्यक प्रवास टाळण्याचे आवाहन हवामान विभागाने केले आहे.
गेल्या काही दिवसांपासून पुणे, मुंबईमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसाने थोडी विश्रांती घेतली आहे. मात्र, पुण्यामध्ये पावसाची हलकी बरसात सुरूच आहे. सांगली, कोल्हापूरमध्येही पावसाचा जोर कमी झाला आहे.
मात्र, दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर राज्यात आजपासून पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. पुढील चार दिवस म्हणजेच १ ते ४ ऑगस्ट या काळात राज्यात पाऊस पुन्हा सक्रिय होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, रायगड, रत्नागिरी या कोकणातील जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तसेच पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, कोल्हापूर, पुण्यासह विदर्भातील चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
तर दुसरीकडे मुंबई, ठाणे, सिंधुदुर्ग, यवतमाळ, नागपूर, वर्धा, भंडारा जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. दरम्यान, पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी काळजी घेण्याचे, अनावश्यक प्रवास टाळण्याचे आवाहन हवामान विभागाने केले आहे.