संगमनेर । नगर सहयाद्री
तालुक्यातील मांडवे बुद्रुक येथील शिवप्रभा ट्रस्टमध्ये एका तरुणाचा 12 ऑक्टोबर रोजी मृतदेह आढळून आला होता. या प्रकरणाचा उलगडा करण्यात घारगाव पोलिसांना यश आले असून, मयताच्या प्रेयसीने प्रियकर सोबत राहत नसल्याच्या कारणावरुन खून केला असल्याचे उघड झाले आहे.
या घटनेनंतर उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे, घारगावचे सहायक पोलीस निरीक्षक हेमंत थोरात, पोलीस उपनिरीक्षक अजय कौटे, आदिनाथ गांधले, पोहेकॉ. दत्तू चौधरी, पोकॉ. सुभाष बोडखे, प्रमोद गाडेकर, महादेव हांडे, महिला पोकॉ. अमृता नेहरकर असे घटनास्थळी दाखल झाले. श्वानपथक, फिंगर प्रिंट, फॉरेंसिक यूनिट पाचारण करण्यात आले होते.
प्रेताची ओळख पटवत असताना ते भाऊसाहेब विठ्ठल बाचकर (रा. जांभुळबन, ता. राहुरी) याचे असल्याचे समजले. त्यानंतर मयत भाऊसाहेबची पत्नी व नातेवाईक यांच्याकडे विचारपूस करता त्यांनी सांगितले, की भाऊसाहेब बाचकर व जयश्री काकासाहेब चव्हाण (रा. काटेपिंपळगाव, ता. गंगापूर, जि. छत्रपती संभाजीनगर) यांच्यामध्ये मागील तीन वर्षांपासून प्रेमसंबंध असल्याने तेव्हापासून दोघेही अहिल्यानगर येथे राहत होते.
दरम्यान, 11 ऑक्टोबर रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास भाऊसाहेब हा पत्नी व मुलाबाळांना भेटण्यासाठी साकूर येथे आला होता. तेव्हा त्याच्यासोबत जयश्री देखील होती. तेव्हा पत्नी योगिता बाचकर हिस साकूर येथे बोलावून घेवून सांगितले, मला आता जयश्री सोबत राहायचे नाही. यापुढे तुझ्या सोबत राहणार आहे. याचा राग आल्याने जयश्री भाऊसाहेब यास म्हणाली, तुम्हांला माझ्यासोबत राहावे लागेल नाहीतर मी तुम्हांला जीवे ठार मारेन, अशी धमकी दिली. त्यानंतर भाऊसाहेब यास जयश्री ही मोटारसायकलवरुन घेवून शिवप्रभा ट्रस्ट येथे गेली. त्यानंतर तिने टणक हत्याराने त्याच्या डोक्यावर वार करुन खून करुन पसार झाली होती.
तपास करताना पोलीस उपनिरीक्षक अजय कौटे, पोकॉ. सुभाष बोडखे, प्रमोद गाडेकर व महिला पोकॉ. अमृता नेहरकर यांच्या पथकाला जयश्री काकासाहेब चव्हाण हिने तिचे पती काकासाहेब शंकर चव्हाण यास फोन करुन नेवासा फाटा येथे बोलविले असल्याची माहिती मिळाली. त्यावरुन सदर ठिकाणी जावून तिला ताब्यात घेण्यात आले असता तिने गुन्ह्याची कबुली दिली.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे यांच्या मार्गदर्शानाखाली सहायक पोलीस निरीक्षक हेमंत थोरात, पोलीस उपनिरीक्षक अजय कौटे, आदिनाथ गांधले, पोहेकॉ. दत्तू चौधरी, पोकॉ. सुभाष बोडखे, प्रमोद गाडेकर, महादेव हांडे, महिला पोकॉ. अमृता नेहरकर, अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालयातील पोना. सचिन धनाड यांनी केली.