काठीच्या मिरवणुकीत हजारो भावीकांचा सहभाग / मळगंगा देवीच्या जयजयकाराने परिसर निनादून गेला
निघोज / नगर सह्याद्री
राज्यातील जागृत देवस्थान असलेल्या मळगंगा देवीच्या ८५ फूट उंचीची काठीची सवाद्य मिरवणूक लक्षवेधी ठरली आहे. शुक्रवारी हळद लावण्याचा कार्यक्रम आणी शनिवार दि.१२ रोजी काठीची मिरवणूक पाहाण्यासाठी गाव व परिसरातील भावीक या मिरवणुकीत मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
दरवर्षी चैत्र अष्टमीला होणाऱ्या यात्रेसाठी लाखो भावीक राज्यातून मोठ्या संख्येने येत असतात. नवसाला पावणारी देवी म्हणून राज्यात नावलौकिक आहे. वर्षभरातील नवरात्र दसरा उत्सव, तसेच यात्रा उत्सवात लाखो भावीकांची मांदियाळी हे या यात्रेचे वैशिष्ट्य ठरले आहे. शनिवारी दुपारी मळगंगा देवीच्या हेमांडपंथी बारवे जवळ सकाळी देवीच्या काठीला अभ्यंगस्नान घालण्यात आले. पुजा अर्चा करण्यात आली. त्यानंतर दुपारी चार वाजता काठी सजवण्यात आली. यावेळी मळगंगा देवीचे पुजारी संतोष गायखे व परिवारातील सदस्यांनी भंडारा उधळून काठी मिरवणूकीसाठी सज्ज केली यावेळी उपस्थित भावीकांनी मळगंगा देवीचा जयजकार करीत जयघोष केला.
या माता मळगंगा देवीच्या जयजयकाराने परिसर निनादून गेला होता. तब्बल तीन तासाच्या मिरवणुकीनंतर ही काठी वाजतगाजत मंदीराजवळ आणण्यात आली या ठिकाणी ही काठी दर्शनासाठी ठेवण्यात आली आहे. काठी उभी राहिल्यानंतर निघोज परिसरातील शेतीचे औत काठीचे कामे यात्रा होईपर्यंत बंद करतात तसेच कोणत्याही प्रकारचा मांसाहार म्हणजे पशुहत्या या परिसरात होत नाही ही शेकडो वर्षाची परंपरा आजही मोठ्या भक्तिभावाने पाळली जात आहे.