संगमनेर । नगर सहयाद्री-
संगमनेर येथील एका मौलानाला लग्नासाठी मुलगी दिली नाही म्हणून त्या मौलानाने त्याच्या मित्रांच्या मदतीने मुलीच्या बापाची निर्घृणपणे हत्या केल्याची धक्कादायक घटना पोलीस तपासात उघड झाली. ही घटना मालदाड भागातील वनात घडली होती. त्यावेळी पोलिसांनी जो पंचनामा करून मयत अन्सारी यांचा खून झाल्याचे निष्पन्न झाले होते. मात्र, कोणताही सबळ पुरावा नव्हता. त्यामुळे, प्रथमतः अकस्मात दाखल करुन आरोपींचा शोध सुरू करण्यात आला होता. आता त्या गुन्हातील आरोपीला पोलिसांनी जेरबंद करण्यात यश मिळवले आहे.
अधिक माहिती अशी: आठ महिन्यांपुर्वी उत्तरप्रदेश येथील मोहंम्मद जाहीद मोहंमद युनुस मुलतानी हे मौलाना चंदा मागण्यासाठी संगमनेर शहरात आला होता. तो जवळच्या एका मशिदीत मौलाना म्हणून काम करीत होता. म्हणून अन्सारी कुटुंबाने त्यांना निवारा दिला. या दरम्यान मोहंमद याने अन्सारी यांच्या मुलीसोबत विवाह करण्याची मागणी घातली. मात्र, मोहंमद जाहिद हा परप्रांतीय असून तो मौलाना काम करण्यासाठी सदैव बाहेर असल्यामुळे मुलीचे काय होईल? याचा विचार करुन बाप म्हणून त्यांनी या विवाहाला नकार दिला.
तेव्हा मोहंमद याने मुलीच्या बापाला धमकी देत निघून गेला. त्यानंतर तो अकोले तालुक्यातील देवठाण येथे मशिदीत मौलाना म्हणून काम करू लागला. त्यानंतर तो कल्याणला गेला. मात्र, अन्सारी यांनी निकाहास विरोध केल्याची सल मोहंमद याच्या मनात कायम होती. त्यामुळे, तो मुद्दाम आहतेशाम अन्सारी यांच्या संपर्कात होता.मुलीच्या बापाने लग्नास नकार दिला. याचा राग येऊन या मौलानाने तुमने लडकी नहीं दि तो मुझे दुसरा भी तरीका आता हैं.! मै तुम्हे बरबाद कर डालूंगा. असे म्हणत मौलानाने ते घर सोडले.
त्यानंतर आहतेशाम अन्सारी हे दि. 3 एप्रिल २०२४ रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास गाडी घेऊन बाहेर पडले. त्यानंतर बराच वेळ झाला, दुसरा दिवस गेला तरी ते घरी आले नाही म्हणून त्यांच्या मुलांनी संगमनेरात शोध घेऊन नातेवाईकांकडे चौकशी सुरु केली. मात्र, त्यांचा शोध लागला नाही. त्यानंतर दि. ४ एप्रिल २०२४ रोजी अन्सारी यांच्या पत्नीने शहर पोलीस ठाण्यात जाऊन मिसिंग दाखल केली होती.
दि. २४ एप्रिल २०२४ रोजी मालदाड येथील वनात एक अनोळखी प्रेत सापडल्याची माहिती सोशल मीडियावर आली होती. त्यानंतर अन्सारी यांच्या मुलांनी संगमनेर येथील कॉटेज हॉस्पिटल मध्ये जाऊन पाहिले असता हा मृतदेह आहतेशाम इलियास अन्सारी यांचाच असल्याचे निश्चित झाले. त्यांच्या वैद्यकीय अहवालानुसार मयत अन्सारी यांच्या अंगावर जखमा आणि गळ्याभोवती दोरीने आवळल्याचे व्रण होते. त्यामुळे, ही हत्या असल्याचे निष्पन्न झाले होते. परंतु कोणताही सबळ पुरावा नसल्याने, प्रथमतः अकस्मात मृत्यूची नोंद दाखल करुन आरोपींचा शोध सुरू करण्यात आला होता.
या दरम्यान आरोपी मोहंमद जाहिद यास ही घटना समजून देखील तो संगमनेरला त्या कुटुंबाचे सांत्वन करण्यास आला नाही. त्याचे आपल्या जबाबात सांगितले होते. की, दि. १ ते ३ या दरम्यान कल्याण येथे होतो. मात्र, त्याचे लोकेशन हे संगमनेर दाखवत होते. अशा अनेक संदिग्ध चुका आरोपी मोहंमद जाहिद याने केल्या होत्या. त्यामुळे हा गुन्हा त्यानेच केल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. त्यानंतर काही पुरावे जमा करुन पोलिसांनी पहिल्यांदा मोहंमद जाहिद यास ताब्यात घेत पोलिसी खाक्या दाखवताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली.
मित्रांच्या मदतीने मुलीचे वडील आहतेशाम इलियास अन्सारी (रा. मदिनानगर, जुना जोर्वे रोड, संगमनेर) यांची मालदाडच्या जंगलात नेऊन हत्या केली. मात्र, पोलीस उपाधिक्षक यांच्या पथकाने या घटनेचा सखोल तपास केला. याप्रकरणी मौलाना मोहंम्मद जाहीद मोहंमद युनुस मुलतानी (रा. साहरणपुर, उत्तरप्रदेश) मोहंमद इम्रान निसार सिद्दकी (रा. कल्याण) व मोहंमद फैजान शमीम अन्सारी (रा. बगदाद अन्सार, ता. धामपुर, जि. बिजनौर) अशा तिघांवर गु.र.नं.४६१/२०२४ भा.द.वी.क. ३०२ .१०२ ब,२०१,५०६,३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी कमी कालावधीत गुन्ह्याची उकल केल्याबद्दल पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे.