अहमदनगर। नगर सहयाद्री-
नायलॉन मांजाबाबत महापालिका प्रशासन आक्रमक झाले असून, नायलॉन मांजा विक्रेत्यांची माहिती देणार्यास पाच हजारांचे रोख बक्षीस मनपाने जाहीर केले आहे.
नायलॉन मांजापासून होणारे नुकसान, मनुष्याला होणारी दुखापत, पशू पक्षांच्या जीवास असलेला धोका याबाबत विविध संघटनांकडून वारंवार लक्ष वेधण्यात येते. ‘नगर सह्याद्री’मध्ये या संदर्भात वृत्त प्रकाशित झाले होते.
त्यानंतर महापालिका प्रशासनाने कठोर भूमिका घेत नायलॉन मांजा विक्रेत्यांवर कठोर कारवाईच्या हालचाली सुरू केल्या आहेत. डॉ. पंकज जावळे यांच्या आदेशाने या संदर्भात एक बैठक घेण्यात आली.
अतिरिक्त आयुक्त डॉ. प्रदीप पठारे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या बैठकीस उपायुक्त अजित निकत, सहायक आयुक्त सपना वसावा, स्वच्छता कक्ष प्रमुख परिक्षित बीडकर, शशिकांत नजान, हरियाली संस्थेचे सुरेश खामकर, अभय ललवाणी आदी उपस्थित होते.बैठकीत नायलॉन मांजा विक्रेत्यांवर कठोर कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला.
नायलॉन मांजाची चोरून विक्री केली जाते. त्यामुळे अशा विक्रेत्यांची माहिती देणार्याची नावे गोपनीय ठेवण्यात येणार आहेत. ही माहिती ७५८८१६८६७२ या मोबाईल क्रमांकावर द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.