अहिल्यानगर | नगर सह्याद्री
घराचे कुलूप डुप्लिकेट चावीने उघडून आत प्रवेश करत 11 तोळे आठ ग्रॅमचे सोन्याचे दागिने, कानातील डायमंड व आठ हजाराची रोकड असा तीन लाख 92 हजार रूपयांचा ऐवज चोरून नेला. 13 मार्च रोजी सायंकाळी सात ते 25 मार्च रोजी रात्री 8:40 वाजेच्या दरम्यान येवलेनगर, सारसनगर येथे ही घटना घडली आहे. या प्रकरणी 1 एप्रिल रोजी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात चार संशयितांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अंजली संतोष अडीवळे (वय 28) यांनी फिर्याद दिली आहे. विकास अंकुश बेरड, दुर्गा विकास बेरड (दोघेही रा. येवलेनगर, सारसनगर), रेखा विजय शिंदे व अजय विजय शिंदे (दोघेही रा. त्रिमुत चौक, सारसनगर) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत. संशयित आरोपी यांनी संगनमत करून फिर्यादीच्या घराचे कुलूप डुप्लिकेट चावीने उघडून आत प्रवेश केला आणि सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरून नेली. चोरीला गेलेल्या वस्तूंमध्ये 11 तोळे 8 ग्रॅम सोन्याचे दागिने, कानातील डायमंड आणि आठ हजार रूपये रोख रक्कम यांचा समावेश असून, चोरी गेलेल्या मालाची एकूण किंमत तीन लाख 92 हजार रूपये असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान, अंजली अडीवळे या आपल्या लहान मुलासह घरी एकट्या राहत असल्याने त्यांनी आपल्या भावास बोलावून घेतले आणि त्यांच्यासह 1 एप्रिल रोजी कॅम्प पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपअधीक्षक अमोल भारती, सहायक निरीक्षक जगदीश मुलगीर, उपनिरीक्षक गजेंद्र इंगळे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. अधिक तपास उपनिरीक्षक इंगळे करीत आहेत.