अहिल्यानगर । नगर सहयाद्री
ध्येय मल्टिस्टेट निधी लिमिटेड पतसंस्थेच्या सुमारे सात कोटी 60 लाख रुपयांच्या अपहारप्रकरणी तोफखाना पोलिसांनी श्रीगोंदा तालुक्यातील विविध शाखांवर छापेमारी केली आहे. या कारवाईत महत्त्वाची कागदपत्रे, संगणक, कॅशबुक, हजेरी रजिस्टर आदी सामग्री तपासासाठी जप्त करण्यात आली आहे. बुधवारी (18 जून) लोणी व्यंकनाथ, कोळगाव, काष्टी, बेलवंडी (ता. श्रीगोंदा) आणि सारोळा कासार (ता. नेवासा) येथील शाखांवर ही कारवाई करण्यात आली. ही कारवाई पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस उपनिरीक्षक शैलेश पाटील यांच्या पथकाने केली.
त्याआधी कर्जत, राशीन, कुळधरण, बिटकेवाडी येथील शाखांवरही अशाच प्रकारे छापे टाकण्यात आले होते. सर्व छाप्यांमध्ये संस्थेच्या आर्थिक व्यवहारांशी संबंधित दस्तऐवज पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. पतसंस्थेने गुंतवणूकदारांना जादा परताव्याचे आमिष दाखवून पैसे जमा करून, नंतर कोणताही परतावा न देता संस्था बंद केल्याचा आरोप आहे. याबाबत सुजाता संदीप नेवसे (रा. सावेडी) यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणात संस्थेचे चेअरमन विशाल लक्ष्मण भागानगरे, व्हा. चेअरमन रोहिदास सत्यदेव कवडे, तसेच इतर पाच संचालकांविरोधात गुन्हा दाखल आहे. संशयित आरोपी फरार असून, फेब्रुवारी महिन्यात रोहिदास कवडे यास अटक करण्यात आली होती. दोन आरोपींना न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन मिळाला आहे. पोलिसांनी प्रकरणाचा फॉरेन्सिक ऑडिट करण्याचा निर्णय घेतला असून, एका खास संस्थेकडून ऑडिट सुरू करण्यात आले आहे. यामध्ये १८४ ठेवीदारांचे सुमारे ७.६० कोटी रुपये अडकले असल्याचे स्पष्ट झाले आहे. ही रक्कम आणखी वाढू शकते, असा पोलिसांचा अंदाज आहे.