अहिल्यानगर । नगर सहयाद्री
शेअर मार्केटमध्ये मोठा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून, श्रीगोंदा येथील एकाने अहिल्यानगरमधील तिघा व्यावसायिकांना तब्बल ७० लाख रुपयांना फसवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पैसे घेतल्यानंतर रक्कम नसलेले चेक देऊन आरोपीने विश्वासघात केला. श्रीगोंदा येथील समीर शब्बीर सय्यद (रा. मुंजोबा चौक) यांच्या विरोधात कोतवाली पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. फिर्यादी इमान बशीर शेख (रा. हाजी इब्राहिम कॉलनी, अहिल्यानगर) यांनी याबाबत तक्रार केली आहे. फिर्यादी इमान शेख, त्यांचा भाऊ अखलाख शेख आणि मित्र जहिर शेख हे तिघेही महापालिकेचे कॉन्ट्रॅक्टर आहेत. २०२३ मध्ये सय्यदने तिघांना भेटून शेअर मार्केटमध्ये मोठा नफा मिळवून देतो, तुम्हीही पैसे गुंतवा असे आमिष दाखवले. सय्यदच्या आश्वासनावर विश्वास ठेवून, तिघांनी ५ महिन्यांसाठी मिळून ७० लाख रुपये गुंतवण्यास तयार झाले. २४ जून २०२४ रोजी जुनी कलेक्टर कचेरी आवारात रीतसर नोटरी करून, इमान व अखलाख शेख यांनी प्रत्येकी १५ लाख, तर जहिर शेख यांनी ४० लाख रुपये रोख दिले. सय्यदने त्याऐवजी अनुक्रमे ३० लाख व ४० लाखांचे चेक दिले, जे १७ डिसेंबर २०२४ रोजी बँकेत जमा केले असता खात्यात पैसे नसल्याने बाऊन्स झाले. त्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे निर्दर्शनास आले.
तरुणावर कोयत्याने जीवघेणा हल्ला; सहा जणांविरोधात गुन्हा दाखल
‘अंकुश अभंग कुठे आहे?’ अशी विचारणा करून, त्याच्याबाबत माहिती न मिळाल्यामुळे सहा जणांच्या टोळक्याने एका ३५ वर्षीय शेतकऱ्यावर लोखंडी कोयता आणि लाकडी दांडक्यांनी थेट हल्ला केल्याची खळबळजनक घटना देहरे (ता. जि. अहिल्यानगर) येथे घडली. फिर्यादी रूपेश बाळासाहेब लांडगे (वय ३५, धंदा–शेती, रा. देहरे) गंभीर जखमी झाले असून, आरोपींनी त्यांना तुला आमच्या जातीचा हिसका दाखवतो, पुन्हा भेटलास तर जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिल्याचेही नमूद केले आहे. याप्रकरणी रूपेश लांडगे यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अनिल गायकवाड, समीर गायकवाड, अजय गायकवाड, ऋषीकेश बागुल, नितीन भांबळ आणि कवीता गायकवाड (सर्व रा. देहरे) यांच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे. सदरची घटना २६ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास घडली. आरोपींनी हातातील कोयता व लाकडी दांडक्यांनी रूपेश लांडगे यांच्या हातावर, पाठीवर, पायावर व खांद्यावर तसेच नितीन भांबळ व कवीता गायकवाड यांनीही लांडगे यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करत जीवाला धोक्याची धमकी दिली. घटनेनंतर २८ ऑक्टोबर रोजी तक्रार दाखल करण्यात आली असून, देहरे परिसरात तणावाचे वातावरण पसरले आहे. पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल थोरात यांच्या देखरेखीखाली सुरु आहे.
सिव्हील हडको’ स्टॉपवर ‘हिट अँड रन’;भरधाव बुलेटची सायकलस्वाराला धडक
शहरातील ‘सिव्हील हडको’ स्टॉप परिसरात ‘हिट अँड रन’ची घटना घडली. भरधाव बुलेटने सायकलस्वाराला जोरदार धडक दिली. अपघातात पांडुरंग सोन्याबापु दळवी (वय ४७, रा. पाईपलाईन रोड, यशोदा नगर) हे गंभीर जखमी झाले आहे. याप्रकरणी त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात बुलेटस्वाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पांडुरंग दळवी हे आकाशवाणी फॅनच्या दुकानात सेल्समन म्हणून नोकरीस आहेत. दिनांक २७ ऑक्टोबर रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास ते आपले काम आटोपून सायकलवरून घराकडे जात होते. दरम्यान सिव्हील हडको स्टॉप येथे भरधाव वेगाने आलेल्या एका अज्ञात बुलेट दुचाकीस्वाराने त्यांच्या सायकलला जोराची धडक दिली. अपघातानंतर बुलेटस्वार क्षणार्धात घटनास्थळावरून पसार झाला. यावेळी आजूबाजूच्या लोकांनी तातडीने धाव घेत दळवी यांना उचलून जवळील सिव्हील हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले.
५० वर्षीय व्यक्तीवर चाकू हल्ला; तिघांविरो धातविरोधात गुन्हा
कोर्ट केसाच्या तारखेला हजर राहण्यास सांगितल्याचा राग मनात धरून, तिघा जणांनी मिळून देहरे येथे एका ५० वर्षीय व्यक्तीवर चाकू हल्ला करून गंभीर जखमी केले. आरोपींनी जातीवाचक शिवीगाळ करत जबरी मारहाण केली, तसेच त्यांच्याकडील रोख रक्कम जबरदस्तीने काढून घेतली. या घटनेत अनिल दादा गायकवाड (वय ५०, रा. देहरे) गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी रुपेश लांडगे, अंकुश अभंग आणि दिपक काळे (सर्व रा. देहरे) यांच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे. २६ ऑक्टोबर रोजी सायंकाळी सुमारे ७ वाजता, गायकवाड यांनी आरोपींना ‘कोर्टाच्या तारखेला हजर रहा, भांडणे टाळा’ असे समजावून सांगितले. यावर आरोपींनी जातीय शिवीगाळ करत गायकवाड यांना लाथाबुक्क्यांनी व चाकूने मारहाण केली. आरोपींनी जिवे मारण्याची धमकीही दिली आणि खिशातील रक्कम काढली असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी मारहाण, जबरी चोरी, जिवे मारण्याची धमकी तसेच अॅट्रॉसिटी कलमांतर्गत गुन्हा नोंदवला आहे. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने करत आहेत.



