पारनेर । नगर सहयाद्री:-
श्री क्षेत्र पिंपळनेर येथून संत निळोबाराय पालखी सोहळ्याचे प्रस्थान शनिवार, दिनांक 21 जून रोजी दुपारी 3 वाजता पंढरपूरकडे होणार असल्याची माहिती संत निळोबाराय संस्थेचे अध्यक्ष अशोकराव सावंत व पालखी प्रमुख व वंशज गोपाळ मकाशीर यांनी दिली. प्रस्थानपूव संत निळोबाराय समाधी व पादुकांची शासकीय महापूजा जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व पोलीस अधीक्षक यांच्या हस्ते पार पडणार आहे. तसेच पंढरपूर येथील हरिभक्त पारायण मोहनानंद महाराज वृंदावडेकर यांचे कीर्तन होणार आहे.
पालखी प्रस्थानाच्या वेळी रथाची महापूजा व रथ नारळ वाढविण्याचा मान जेष्ठ समाजसेवक अण्णासाहेब हजारे, विधान परिषदेचे सभापती राम शिंदे, कृषिमंत्री माणिकराव कोकाटे आणि जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांना देण्यात आला आहे. या पालखी सोहळ्यात 67 दिंड्या सहभागी असून त्यातील 43 दिंड्यांना शासनातर्फे प्रत्येकी 20,000 रुपये निधी वर्ग करण्यात आलेला आहे.
शासनाने सोहळ्याच्या प्रत्येक मुक्कामासाठी वॉटरप्रूफ मंडप, पाण्याचे टँकर, फिरती स्वच्छतागृहे, ॲम्बुलन्स, डॉक्टर व पोलीस बंदोबस्त यांसह सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. वारकरी भक्तांनी पांडुरंगाच्या दर्शनासाठी कमर कसली असून संपूर्ण पिंपळनेर गाव भक्तीमय वातावरणाने भारावले आहे. या कार्यक्रमासाठी जिल्ह्यातील सर्व आमदार, खासदार, विविध पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असून भाविकांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.