मुंबई । नगर सहयाद्री:-
आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीच्या भाग म्हणून महाविकास आघाडीने आयोजित केलेल्या मेळाव्यात अनेक ताज्या राजकीय चर्चा आणि आरोप-प्रत्यारोप झाले. यावेळी उद्धव ठाकरे, शरद पवार आणि इतर प्रमुख नेत्यांनी महायुतीवर जोरदार हल्ला चढवला, तर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांना सरडा म्हणून संबोधित करत टीकास्त्र सोडले.
राऊतांनी आपल्या भाषणात अजित पवारांचे तीव्र विरोधक म्हणून चित्रण केले. त्यांनी म्हटले की, “सुप्रिया सुळे ही महाराष्ट्राची लाडकी बहीण आहे. तिच्या साठी महाराष्ट्र लढला आहे. परंतु तुमचे लाडके भाऊ रंग बदलले आहेत. ते आता पिंक झाले आहेत. सरडा रंग बदलतो, पण अचानक गुलाबी कसा होईल? आता हा गुलाबी सरडा बारामती सोडणार असं ऐकलं आहे.”
राऊतांनी पुढे सांगितले की, तेलंगणा राज्यात केसीआर यांच्या नेतृत्वाखाली गुलाबी रंगातील राजकारण पराभूत झाले आहे आणि पिंक रंग कधीही राजकारणात यशस्वी होत नाही. त्यांनी दावा केला की, भगवा रंग किंवा तिरंगा हेच यशाच्या प्रतीक आहेत आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनुसार तिरंग्याचे रक्षण फक्त भगवा रंग करू शकतो. असे म्हणत राऊतांनी अजित पवारांविषयी सुस्पष्ट उल्लेख न करता त्यांच्यावर घणाघात केला.